अडीच लाखांची लाच घेणारा न्यायालयातील बेलीफ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मिळकतीचा ताबा थांबवून त्यात हरकत नोंदवून मदत करण्यासाठी तब्बल अडीच लाखांची लाच घेताना न्यायालयातील बेलीफ एसीबीच्या जाळ्यात अडकला. यामुळे
शिवाजीनगर न्यायालयासह वकिलांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.

मनोहर रूद्राप्पा कांबळे (वय 48) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या बेलीफचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर कांबळे हा शिवाजीनगर लघुवाद न्यायालयात बेलीफ म्हणून नोकरीस आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार यांच्या मिळकतीबाबत लघुवाद न्यायालयात केस सुरू आहे. न्यायालयाने त्यांच्या मिळकतीचा ताबा देण्याचा आदेश दिले होता. तक्रारदार यांच्या मिळकतीचा ताबा थांबवून, त्यांची त्यात हरकत नोंदवून मदत करण्यासाठी म्हणून लोकसेवक कांबळे याने त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, शनिवारी दुपारी कांबळे यांना तक्रारदार यांच्याकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात न्यायालयाच्या आवारात पकडण्यात आले.

अडीच लाखांमध्ये 30 हजार रुपयांच्या खर्‍या नोटा तर, इतर बनावट नोटांचे बंडल देण्यात आले होते.  ही कारवाई मनपाजवळील पेट्रोलपंपासमोर लाच स्विकारताना करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/