Pune : ॲक्टेंमरा व रेमिडीसिव्हर इंजेक्शन काळया बाजारात विकणारे अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कुरकुंभ एमआयडीसी येथे कारवाई

पुणे : कोरोना महामारीमध्ये रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा असल्याची संधी साधून काळ्या बाजाराने विकणाऱ्या तिघांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुरकुंभ येथे रविवारी (दि. 9 मे 2021) कारवाई करून एक अ‍ॅक्टेंमरा, 6 रेमडिसिव्हर इंजेक्शन जप्त केली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दत्तात्रय मारुती लोंढे (वय ३५, रा. संम्मती अपार्टमेंट, दौंड, ता. दौंड, जि. पुणे. मूळ रा. नवीन गार, ता. दौंड जि. पुणे), अदित्य अनिरुध्द वाघ (वय २५, रा. साईनाथनगर, पोफळे स्टेडीयमजवळ, निगडी, पुणे. मूळ रा. आणेवाडी, ता. जि. सातारा) आणि अमोल नरसिंग मुंडे (वय २५, रा. कळवा नाका, सिध्दीविनायक सोसायटी, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मुंबई येथून अ‍ॅक्टेंमरा व रेमडिसिव्हर इंजेक्शन आणून कुरकुंभ येथे काळ्या बाजाराने विक्री करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे तपास सुरू असताना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरकुंभ एमआयडीसी (रिलायन्स कंपनी गेटसमोर, ता. दौंड, जि. पुणे) येथे रविवारी (दि. 9 मे) कुरकुंभ एमआयडीसी रिलायन्स कंपनीचे गेटसमोर सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ ॲक्टेंमरा, ६ रेमिडीसिव्हर असे एकूण ७ इंजेक्शन 60 हजार 675 व रोख 51 हजार 100 रुपये, तीन मोबाईल, होंडा अ‍ॅक्टिव्हा, सँट्रो कार असा एकूण तीन लाख 62 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पुढील अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ करीत आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, मुकेश कदम, प्रमोद नवले, अक्षय नवले, बाळासो खडके, प्रसन्न घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.