पुणे : जामीनावर जेलमधून बाहेर आल्यानंतर डॉक्टरची वेषभूषा करून 5 महिन्यात पाच वाहने चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जानेवारीत जामीनावर बाहेर पडल्यानंतर पुन्हा शहरातील विविध भागातून वाहने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास हडपसर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 5 गुन्ह्यांची उकल करत पावणे चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तो डॉक्टरची वेशभूषा करून वाहने चोरत असे. शहारुख रज्जाक पठाण (वय 23, रा. शेळके मळा, ता. यवत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पठाण याला गेल्या वर्षी फरासखाना पोलिसांनी वाहन चोरीप्रकरणात पकडले होते. त्यावेळी त्याच्याकडून तबल 26 गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. त्यानंतर तो कारागृहात होता. पंरतु, या गुन्ह्यातून तो जानेवारी महिन्यात जामीनावर बाहेर आला. जामीनावर आल्यानंतर त्याने पुन्हा वाहन चोऱ्या करण्यास सुरुवात केली. दरम्यान शहरातील वाहन चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी हद्दीत गस्त घालून या चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हडपसर पोलीस माहिती काढत होते.

त्यावेळी कर्मचारी नितीन मुंढे आणि विनोद शिवले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पठाण याला पकडण्यात आले. त्याने हडपसर, बंडगार्डन आणि कोंढवा परिसरात वाहने चोरली आहेत. त्याच्याकडून 5 गुन्हे उघड झोले असून, 3 लाख 80 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान तो वाहने चोरताना डॉक्टरांचा गणवेश परिधान करत असे. त्यामुळे त्याच्यावर कोणाचा संशय येत नव्हता.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक, रमेश साठे, पोलीस निरीक्षक हेमराज कुंभार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.