Pune : कृषी विधेयकविरोधातील आंदोलन देशातील सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन : राजू शेट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रसरकार अदानी आणि अंबानी या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात धंदा करता यावा यासाठी पायघड्या घालण्यासाठी मागणी नसताना तीन विधेयके माथी मारले आहेत. पंजाब, हरीयाणा आणि चंदिगड येथील शेतकऱ्यांचे हे आंदोलन नसून समस्त देशातील शेतकऱ्यांचे आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेट्टी पुढे म्हणाले, दिल्ली येथे कृषी कायद्या विरोधात मागील 12 दिवसापासुन आंदोलन केले जात आहे. या बद्दल केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली जात नाही. राष्ट्रीय महामार्गांवर खंदक करून शेतकऱ्यांचे मोर्चे अडवले जात आहेत. त्यांच्या मनात काय हे जाणून घेतले जात नाही. उलट हे आंदोलन खलिस्तानीवादी लोकांचे आहे असे म्हणत जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ पंजाब, हरीयाणा आणि चंदीगड या राज्यातील शेतकऱ्यांचे हे आंदोलन आहे असं म्हणत हिणवलं जात आहे. कारण शेतकरी अशांत झाला तर संपुर्ण देश अशांत होईल. त्यांचा संयम तुटला तर त्याचा देशात उद्रेक होईल, त्यामुळे केंद्रसरकारने तातडीने त्यांच्याशी बोलून तोडगा काढावा.

कोणत्याही शेतकऱ्यांची मागणा नसताना तीन कृषी विधेयके लादली जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ उद्या (दि.8) भारत बंदची हाक दिली आहे. त्या बंदमध्ये देशातील जनतेने उस्फूर्तपणे सहभागी व्हावे. एक दिवस बळी राजासाठी म्हणून सर्वांनी सहभाग घेतल्यास, केंद्र सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल. तसेच मी उद्या कोल्हापूर येथे सहभागी होणार आहे.