Pune : विकेंडच्या पाचव्या रविवारी हडपसर बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प

पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध केलेल्या विकेंडच्या पाचव्या रविवारी हडपसर बाजारपेठेमधील सर्व व्यवहार ठप्प होते. रस्त्यावर रिक्षा आणि इतर खासगी वाहनांची काहीशी वर्दळ होती. हडपसर गाडीतळ, गांधी चौक, मगरपट्टा चौक, रामटेकडी, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, फुरसुंगी, देवाची उरुळी, लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरातील सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. गल्लीबोळातील रस्तेही मोकळे दिसत होते. एरवी मोकळ्या रस्त्यावर क्रिकेटचा डाव मांडणारी तरुणाईने चक्क घरात बसणे पसंत केले होते. सोसायट्यांमध्ये चिमुकल्यांची क्रिकेटमधील धावपळ दिसत नव्हती. प्रत्येकाच्या तोंडाला मास्क आणि दूर थांबा असे सांगत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

उपनगर आणि परिसरातील उद्याने आणि शाळा-महाविद्यालयांची मैदाने ओस पडली होती. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन किती दिवस राहणार वाढणार का, याविषयी कुटुंबांमध्येही चर्चा सुरू होती. दूरचित्रवाणीवरील आणि वृत्तपत्रांमधील बातम्यांबरोबर सोशल मीडियातील बातम्यांवर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे सध्या तरी कोरोना या एकाच विषयाने गंभीर रूप धारण केले आहे. सोसायटीतील शेजारीपाजारी, गावाकडे, नातेवाईक कोणी पॉझिटिव्ह आहेत का, असतील तर त्यांना काळजी घ्या, वेळेत उपचार करा असा सल्ला भ्रमणध्वनीवरून दिला जात आहे. प्रत्येकजण आहे तेथेच थांबा, फिरू नका, कामाशिवाय कुठेही जाऊ नका असा सल्ला आवर्जून देत आहेत.

कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जागा मिळत नाही, बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड याचीच जास्त चर्चा आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमधून आर्थिक लूट होत आहे, ही बाजूही अनेकांकडून सांगितली जात आहे. उपचार न करताच अवाजवी बिले आकारली जात आहेत. त्यावर कोणाचेही बंधन नाही. कोरोनावर शासनाने लस उपलब्ध करून दिली आहे. ती लस मिळविण्यासाठी 18 ते 44च्या वयोगटातील नागरिकांची प्रचंड धावपळ सुरू आहे, तर 45 च्या पुढील नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळत नाही, अशी अवस्था आहे. मोबाईल आणि लॅपटॉप-कॉम्प्युटरवर नोंदणी करण्यासाठी प्रत्येकजण घाई करीत आहे. शासनाने दिलेली साईट ओपन करेपर्यंत नोंदणी पूर्ण झालेली दिसत आहे. त्यामुळे लस कशी मिळवायची यासाठी तरुणाईबरोबर ज्येष्ठ नागरिकांनाही प्रश्न पडला आहे. प्रशासनाने लस देण्यासाठी थेट नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.