Pune : संघटित गुन्हेगारी टोळयांना ‘प्रत्यक्ष’ अन् ‘अप्रत्यक्ष’ मदत करणार्‍या शहरातील ‘त्या’ बडया हस्तीची आयुक्तालयात तासभर कसून चौकशी, वेगळयाच चर्चेला उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कंबर कसली असून, या टोळ्यांना मदतआणि त्यांच्यासाठी मध्यस्थी करत असल्याच्या संशयातून शहरातील एका बडया हस्तीला आज पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. ‘त्या’ बडया हस्तीला चौकशीसाठी नेमकं का बोलावलं याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र, अखेर काहीजणांनी ‘ऑफ द रेकॉर्ड’ सर्व प्रकरण सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गँगवार संपवण्यास आयुक्तांनी खालच्या टोकापासून सुरुवात केली आहे. ते लोण आता वरच्या टोकापर्यंत गेल्याचे दिसत आहे. गजा मारणे याच्या त्या तळोजा-पुणे जंगी रॅलीनंतर आयुक्तांनी गुन्हा दाखल करत त्याला आणि चाहत्यांना दणका दिली. यानंतर आयुक्तांच्या मोक्काच्या कारवाईने गुन्हेगार आणि त्याचे पाठीराखे यांचे धाबे दणाणले आहेत. नंदू नाईक नंतर सोमनाथ गायकवाड या धंदेवाल्यांना दणका देत शहरात टोळ्यासोबतच अवैध धंदे करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आयुक्तांच्या मोक्का कारवाईने भलेभले गार झाले. आयुक्तांनी गुन्हेगार, अवैध धंदेवाल्यानंतर आणि आता त्यांना मदत आणि त्यांच्यात ‘मांडवली’करून मिरवणाऱ्या बड्या हस्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

याच संदर्भात शहरातील एका बडया हस्तीला पोलिस आयुक्तालयात आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अमली पदार्थ विरोधी पथकात त्यांना बोलवण्यात आले होते. बडया हस्तीची जवळपास तासभर चौकशी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर काही तास ते वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाट पाहत थांबले होते. त्यांना नेकमे का बोलावले असेल अशी चर्चा दिवसभर आज आयुक्तालयात सुरू होती. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आता शहरातील व्हाईट कॉलर (जंगी मिरवणूकीला आर्थिक पाठबळ देणार्‍या) लोकांवर कारवाई करणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.