Pune : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुटणार्‍या टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पायी जाणाऱ्या नागरिकांना (Citizens) लिफ्ट (lift) देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळीला (Gang) पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे. ही टोळी पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून त्यांना निर्जनस्थळी नेऊन त्यांच्याकडील किंमती सामान लुटत (Robbed) होती. त्यांनी केलेले जबरी चोरीचे (Theft) दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे (वय -21रा.बेटवाडी, होलेमळा ता.दौंड), राजेश संभाजी बिबे (वय – १९ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे मूळ रा.माळेवाडी ता.जि.बिड), अजय ज्ञानेश्वर पवार (वय -19 रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली जि.पुणे मूळ रा.गिरीम ता.दौंड), विशाल दिलीप आटोळे (वय -24 रा.गोपाळवाडी, गोकुळनगर ता.दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संजय मिश्रीलाल मुनोत (वय-54) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी मुनोत हे बार्शी येथून एसटीने कुरकुंभला उतरले. ते दौंडला घरी जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून लिफ्ट देतो असे सांगून एक अनोळखी इसम त्यांना घेऊन गेला होता. त्यानंतर त्यांना एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाऊन त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम, दोन सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ असा एकूण 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना कुरकुभ येथे काही आरोपी चोरीचे सोने विकण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी दौंड परिसरात जबरी चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हि कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार महेश गायकवाड, पोलीस हवालदार निलेश कदम, सचिन गायकवाड, पोलीस नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत, पोलीस कॉन्स्टेबल दगडू विरकर यांनी केली आहे.