Pune : तरूणाच्या डोक्यात दगड आणि बाटली फोडत बेदम मारहाण, चतुःश्रृंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चतु:श्रृंगी भागात तरुणाच्या डोक्यात दगड आणि बाटली फोडत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. केवळ मित्राला मारल्याचा जाब विचारण्यास गेल्याने त्याला मारहाण झाली आहे.

याप्रकरणी अविनाश राजेश डोकडे (वय 23, रा. वडारवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवदास पवार (वय 20) आणि महेंद्र धोत्रे (वय 21, दोघेही रा. वडारवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा तोंडओळखीचा मित्र अंकुश यास आरोपी पवार याने रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कानाखाली मारली होती. त्यामुळे फिर्यादी आरोपीला जाब विचारण्यास गेला व ‘अंकुश याला का मारले,’ असे विचारले. त्याचा राग आल्याने आरोपीने त्याठिकाणी पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीला जखमी केले. तसेच, पवारने काचेची बाटली फिर्यादीच्या खांद्यावर आणि डोक्यात मारली. फिर्यादीची आई आणि मित्र भांडणे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ केली. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलिस करत आहेत.