Pune : लसीकरण करणाऱ्यांचा डाटा मिळवून ‘भाजप’वाल्यांनी प्रचार सुरु केला, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. लसीकरणासाठी नागरिकांना ऑनलाइन बुकिंग करावी लागते. नागरिकांनी अपलोड केलेला डाटा वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेवकाने बेकायदेशीररित्या मिळवला आहे. तसेच संबंधित नगरसेवकाने स्वत:चे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र नागरिकांना पाठवून प्रचार सुरु केला आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

यासंदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे सायबर सेलच्या उपायुक्त भाग्यश्री नवाटके यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निवेदनामध्ये लसीकरण झालेल्या नागरीकांचा विविध केंद्रावर डाटा जमा झालेला आहे. हा डाटाच भाजपच्या नगरसेवकांनी मिळविला आहे. त्यांना हा डाटा कोणी पुरविला याची चौकशी करावी, संबंधित नगरसेवक आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असल्याचे जगताप यांनी सांगितले.

नागरीकांना लसीकरणासाठी कोविन अ‍ॅप वर ऑनलाईन नोंदणी करावी लागते. मोबाईल क्रमांक आणइ आधारकार्ड क्रमांकही ऑनलाईन अर्जात नमूद करावा लागतो. लस घेतल्यानंतर संबंधित नागरीकाला लस घेतल्याचा आणइ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोबाईल क्रमांकावर ‘ओटीपी’ नंबर पाठवला जातो. हा ओटीपी नंबर कोविन अ‍ॅपवर टाकल्यानंतरच प्रमाणपत्र पाहता येते, डाऊनलोड करता येते. परंतु, वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघातील एका भाजपच्या नगरसेवकाकडून नागरीकांना व्हॉट्सअ‍ॅपवर केंद्र सरकारचे प्रमाणपत्र कसे पाठविले जाते हा प्रकार संशयास्पद आहे, असे जगताप यांनी म्हटले आहे.

मोबाईल क्रमांक आणि आधारकार्ड क्रमांक हा महत्वाचा डाटा आहे. तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार, महापालिका प्रशासनाने जतन करणे आवश्यक आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाला, व्यावसायिक आस्थापनांना देता येत नाही. असे असतानाही शहरात विविध केंद्रांवर लसीकरण झालेल्या नागरीकांचा डाटा काही नगरसेवकांनी बेकायदेशीररीत्या मिळविला आहे. नागरीकांच्या मोबाईल क्रमांकावर केंद्र सरकारचे व नगरसेवक स्वतःचा प्रचार करणारे प्रमाणपत्र नागरीकांना पाठवित आहेत, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.