Pune : चतुःश्रृंगी, भारती विद्यापीठ, विमानतळ आणि कोंढव्यात घरफोडया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद घातला असून, आज वेगवेगळ्या भागात चार फ्लॅट फोडत लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे. तर दुसरीकडे या घटना रोखण्यास अपयश येत असल्याचे दिसत आहे. चतुःश्रृंगी, भारती विद्यापीठ, विमानतळ व कोंढवा भागात दोन ठिकाणी घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर कोळी (वय 35) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोळी हे आंबेगाव बुद्रुक येथे दत्तनगर चौकात राहतात. इमारतीच्या तळ मजल्यावर ते राहण्यास आहेत. या दरम्यान ते दुपारी (दि. 1 एप्रिल) 1 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील लॉकरमधून 25 हजाराची रोकड व दागिने असा 1 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ते 2 वाजता परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. यानंतर पोलीस यंत्रणेला घटनेची माहिती देण्यात आली.

तर दुसरा प्रकार हा चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याबाबत 78 वर्षीय जेष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. फिर्यादी हे बाणेर पाषाण लिंक रोडवर बेलरोज सोसायटीत राहतात. यादरम्यान जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात उघड्या दरवाजातून अज्ञात चोरटा घरात शिरला. त्याने घरातून रोकड, दागिने आर्टिफिशियल हार असा 1 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. अधिक तपास चतुःश्रुगी पोलीस करत आहेत. तसेच विमानतळ पोलीस ठाण्याच्या परिसरात लोहगाव येथे राहणारे गणेश इंगळे (वय 35) यांचा फ्लॅट फोडून 59 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. फिर्यादी हे 1 एप्रिल रोजी सकाळी दुपारी 1 ते 3 वाजण्याच्या सुमारास घर बंद करून बाहेर गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून ऐवज चोरला आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

कोंढवा भागात देखील चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडला आहे. याबाबत रवींद्र पिसाळ यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे मूळ गावी गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी शेफ्टी डोअरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातून 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यासोबतच रमा कुलकर्णी यांचे कंपनीचे कार्यालय याच इमारतीत आहे. चोरट्यांनी कार्यालयात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सुदैवाने चोरट्यांच्या हातात काही लागलेले नाही. कात्रज कोंढवा रोड येथे गोकुळनगर भागात या घरफोड्या झाल्या आहेत. दरम्यान, घरफोड्याची वाढत्या घटना या पुणेकरांसाठी चिंतेचा विषय असून, पोलीस अनेक उपाययोजना करत आहेत. पण त्या रोखल्या जात नसल्याचे यावरून दिसत आहे.