Pune : ‘ब्रेक द चेन’ला नागरिकांचा प्रतिसाद, वाहनांची वर्दळ सुरूच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा ज्वर थांबविण्यासाठी विकेंडचा लॉकडाऊन संपल्यानंतर आज चौथ्या दिवशी राज्य सरकारने 15 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाची महामारी नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन ही नवी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद देत घरात थांबणे पसंत केले आहे. मात्र, रस्त्यावर काहीशी वाहनांची वर्दळ होती. तसेच हॉटेल, स्वीट होम, किराणा मालाची दुकाने, औषधालये, चिकन-मटण, मासळी आदींची दुकाने सुरू असल्याने नागरिक संभ्रमात पडल्याचे दिसून आले. अत्यल्प दुकानदारांनी अर्ध्याहून कमी शटर उघडले होते, तर काहींनी मागच्या दाराने व्यवहार सुरू ठेवले होते.

पुणे-सोलापूर रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने लॉकडाऊन आहे की नाही, अशीच चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. अत्यावश्यक सेवेतील औषधालये, रुग्णालये आणि कंपन्या, उद्योगधंदे व्यवसायामधील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जावे लागले. त्यामुळे त्यांची रस्त्यावर ये-जा सुरू राहिली. पीएमपी बस बंद असल्याने रिक्षाचालकांकडून मात्र नागरिकांची लूट सुरूच राहिली आहे. किरणा मालाच्या दुकानात नागरिकांची गर्दी होती, तर स्वीट होममध्ये दूध खरेदी करण्याच्या बहाण्याने ग्राहक ये-जा करीत होते. उपनगर आणि परिसरामध्ये रुग्णवाहिकांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांच्या धडकन वाढली आहे. बेड मिळत नाही, व्हॅक्सीन, बेड, अतिदक्षता बेड, ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांची तडफड होत आहे, अशाच विषयावरच प्रत्येकजण कोरोनावर चर्चा करताना दिसत आहे. बेड मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी आता तरी आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, त्याबाबतही पालक-विद्यार्थ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. परीक्षा होणार की नाही, अशीच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मागिल वर्षभर ऑनलाइन अभ्यास सुरू असला तरी अनेक विद्यार्थ्यांचा मोबाईल, नेट अशा तांत्रिक अडचणीमुळे अभ्यास झाला नाही. त्यांच्याकडून क्रमिक पुस्तकांमधून अभ्यास झाला असला तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याची खंत पालक-विद्यार्थ्यांकडून बोलून दाखविली जात आहे.