Pune : हडपसरमधील मगर रुग्णालयात लसीकरण बंद असल्याने नागरिक त्रासले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हडपसर (मगरपट्टा चौक) येथील खासदार कै. अण्णासाहेब मगर रुग्णालयात आज लसीकरण बंद असल्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली गेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ आणि अपंग नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. येथील दूरध्वनी सेवा बंद होती, तसेच माहिती दिली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज हडपसरमधील कोविड सेंट्रला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी मगर रुग्णालयातील माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांशी संपर्क साधून कोविड लसीकरण बंद होते, तर नागरिकांना माहिती का दिली नाही, असा जाब विचारला. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या, दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी बंद करू नका, असे त्यांनी सांगितले.

हडपसर आणि परिसरातील नागरिक मगर रुग्णालयामध्ये कोविड लसीकरणासाठी येतात. मात्र, आज (शनिवार, दि. 17) लसीकरण बंद होते. मात्र, ऑनलाइन पद्धतीने अनेकांना आज लसीकरणासाठी बोलावले गेले होते. त्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी येथे आल्यानंतर त्यांना लसीकरण बंद असल्याचे समजले. त्यामुळे पालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. केंद्र राज्य शासनाने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध केले आहेत, रस्त्यावर येऊ नका, गर्दी करू नका असे जाहीर केले आहे. मात्र, पालिका प्रशासनाला त्याची माहिती नव्हती का, त्यांनी आम्हाला लस घेण्यासाठी का बोलावले, सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करण्याचा यांना अधिकार कोणी दिला, मगर रुग्णालयातील दूरध्वनी सेवा बंद का ठेवली, तेथील कर्मचाऱ्यांनी रिसिव्हर बाजूला काढून का ठेवला, त्यांना पगार मिळत नाही का, लसीकरण बंद होते, तर रुग्णालय सुरू का ठेवले, नागरिकांना सुविधा द्यायच्याच नाही, तर तसे स्पष्ट करा, असे एक ना अनेक प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केले.