पुण्यातील ‘त्या’ कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील 44 नागरिक नागरिकांची टेस्ट ‘निगेटीव्ह’ : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात दुबईहून आलेल्या एकाच कुटुंबातील ३ जणांसह चारजणांना कोरोनाची लागण असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या ४४ नागरिकांचा शोध घेण्यात आला आहे. त्या सर्वांची तपासणी केली असून सुदैवाने यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, हे वैद्यकिय तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. परंतू बाहेरील देशातून विमानाने येणार्‍या प्रवाशांना आरोग्य अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या आणि नायडू रुग्णालयामध्ये उपचार घेणार्‍या पाचही नागरिकांची प्रकृती उत्तम आहे. नागरिकांनी घाबरू नये, मात्र सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

मागील आठवड्यात दुबईहून पुण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील तीनजणांना कोरोनाची लागण असल्याचे समोर आले आहे. यानंतर महापालिका प्रशासनाने कोरोना बाधितांवर उपचार तसेच संशयितांच्या तपासणीसोबतच जनजागृतीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या संसर्गजन्य आजाराच्या जागतिक पातळीवरील परिस्थिती पाहून प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व पक्षिय पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी व प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होेते. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वरिल माहिती दिली.

महापौर मोहोळ यांनी सांगितले, की आतापर्यंत कोरोनाचे १८० संशयित नायडू रुग्णालयात दाखल झाले. त्यापैकी १२४ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना तपासणी करून सोडून देण्यात आले आहे. तर यापुर्वी दुबईहून आलेल्या दांम्पत्यासह ज्या पाचजणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या पाच जणांच्या संपर्कात आलेल्या ४४ नागरिकांना शोधून त्यांच्याही तपासण्या करण्यात येत आहेत. साधारणपणे ज्या परिसरात रुग्ण राहातात, त्याठिकाणच्या तीन कि.मी. परिसरातील ६५० सदनिकांमध्ये राहाणार्‍या नागरिकांकडे चौकशी करण्यात येत आहे. रात्री उशिरा त्यापैकी २५ जणांच्या तपासणीचे अहवाल प्रयोगशाळेकडून आले आहेत. सुदैवाने त्या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या संसर्गाची जागतिक पातळीवरील परिस्थिती पाहून परदेशातून येणार्‍या प्रवाशांना येथे आल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या तपासण्या केल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल. केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसारच सध्याच्या परिस्थितीत ही कार्यवाही अवलंबिणे हा मार्ग आहे. नागरिकांकडूनही यासाठी सहकार्य मिळत आहे. यासाठी महापालिकेने विविध इमारतींमध्ये यासाठी व्यवस्था केली आहे.

नायडू रुग्णालयामध्ये ६ बेडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्यावी. कुठल्याही उत्सवाला बंदी नाही पण गर्दी होऊ नये यासाठी शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. जनजागृती साठी अधिक व्यापक प्रयत्न करण्यात येईल. पालिकेच्या कार्यालयांमध्ये ही काय काळजी घ्यावी यासाठी परिपत्रक. पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठीची सोडतही पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली.

कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीची यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने खर्चाचे निर्णय तातडीने घ्यावेत. यासाठी होणार्‍या खर्चाला पश्‍चात मान्यता देण्यात येईल. सर्व नगरसेवक आपल्या सोबत आहेत, असे आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये प्रशासनाला आश्‍वस्त करण्यात आले आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी यावेळी दिली.

मास्कचा बागुलबुवा नको
मास्क आणि सॅनेटायजरचा काळाबाजार सुरू असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, नागरिकांनी दक्षता म्हणून सार्वजनिक ठिकाणी साधा रुमाल बांधण्यास हरकत नाही. परंतू मास्कचा बागुलबुवा करू नये. कोरोनाची लागण झालेला नागरिक वरच्या मजल्यावर राहात असेल आणि तुम्ही खालच्या मजल्यावर राहात असाल तरी मास्क वापरण्याची गरज नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.