Coronavirus in Pune : गेल्या 24 तासात पुण्यात ‘कोरोना’चे 5529 नवीन रुग्ण, 6530 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना मृत्यूची संख्या देखील वाढू लागली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे शहरात देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये 5529 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 6530 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 82 हजार 491 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 56 रुग्ण शहरातील आहेत तर 22 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 6 हजार 274 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 6 हजार 530 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 24 हजार 297 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 24 हजार 409 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 51 हजार 920 इतकी आहे. त्यापैकी 1314 रुग्ण गंभीर आहेत. तर 6235 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 42 हजार 451 इतकी झाली आहे. त्यापैकी 6 लाख 29 हजार 205 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या 1 लाख 1 हजार 691 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत 11 हजार 555 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.75 टक्के इतके आहे.