Pune : सणसवाडीतील कोविड सेंटर रुग्णांच्या प्रतीक्षेत; शासकीय विभागाकडून आलेले बेड व आदी साहित्य धूळखात पडून

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणी शासनाच्या वतीने कोविड सेंटर उभारले जात असताना शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात देखील शासनाच्या वतीने पहिल्या लाटेच्या वेळेस तब्बल एकशे पन्नास बेड चे कोविड सेंटर उभारण्यात आलेले होते, मात्र त्यांनतर रुग्ण संख्या कमी झाल्याने सदर ठिकाणचा वापर बंद झाला , सध्या येथील कोविड सेंटर मधील सर्व साहित्य धूळखात पडलेले असून कोविड सेंटर देखील रुग्णांच्या प्रतीक्षेत आहे.

सणसवाडी ता. शिरूर येथील कृष्णलीला मंगल गार्डन  येथे आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने १ ऑक्टोबर २०२० रोजी तब्बल एकशे पन्नास बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले असताना सदर कोविड सेंटरचे उद्घाटन देखील खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या हस्ते अनेक मान्यवर व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते तसेच यावेळी शिक्रापूर व सणसवाडी ग्रामपंचायतच्या वतीने चौदाव्या वित्त आयोग निधीतील दोन रुग्णवाहिकांचा देखील लोकार्पण करण्यात आले होते, तर शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने या ठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आलेली होती, परंतु सदर कोविड सेंटर सुरु होताच कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली त्यामुळे येथील कोविड सेंटरमध्ये कोणतेही रुग्ण दाखल झाले नाही व प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष झाले, मात्र सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना शिरूर तालुक्यात देखील शेकडो रुग्ण दररोज आढळून येत असताना कोठेही बेड उपलब्ध होत नाहीत, तर बेड मिळविण्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे, मग येथे सुरु केलेले कोविड सेंटर जागा व सर्व साहित्य असताना देखील प्रशासन का सुरु करत नाही असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

कोविड सेंटर सुरु करण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे, सणसवाडी येथे कोविड सेंटरचे साहित्य देखील असल्याने त्याची माहिती देऊन पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्यासाठी कार्यवाही केली जाईल असे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी सांगितले.

शिक्रापूर व सणसवाडी परिसरात कोविड सेंटर सुरु करण्याबाबत प्रयत्नशील आहे, सध्या तळेगाव ढमढेरे या भागात कोविड सेंटरसाठी मागणी आहे, मात्र सणसवाडी येथील कोविड सेंटर सुरु करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊन लवकर कोविड सेंटर सुरु केले जाईल असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.