Pune News : पानटपरी चालकाकडून उकळला चक्क दररोज 500 रुपये हप्ता, कोंढव्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पानाची टपरी चालविणाऱ्या तरुणाकडे एका गुंडाने चक्क दररोज ५०० रुपये प्रमाणे २५ हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून तो हा हप्ता वसुल करीत होता.इम्तियाज दाऊद मेमन (वय ४५, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

याप्रकरणी रमजान रज्जाक खान (वय २३, रा. बाबाजान मस्जिद जवळ, शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलिसनामा ला दिलेल्या माहितीनुसार, रमजान खान यांची सत्यानंतद हॉस्पिटलसमोर पान टपरी आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते पान टपरी चालवितात. मागील २ महिन्यांपासून मेमन याने फिर्यादी खान यांना धमकावून पान टपरी चालवायची असेल तर मला दररोज ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, पैसे दिले नाही तर तुझी टपरी बंद करेन अशी धमकी दिली या धमकीला घाबरून फिर्यादी हा गेले २ महिने त्याला हप्ता देत होता. आतापर्यंत त्याने २५ हजार रुपये मेमन याला दिले. आता मात्र त्याला पैसे देणे शक्य नसल्याचे त्याने सांगितल्यावर मेमनने त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. शेवटी त्याने कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक दादा राजे पवार यांनी इम्तियाज मेमन याला अटक केले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर करीत आहे.