Pune : दुचाकीला कट मारल्याच्या रागातून 9 जणांच्या टोळक्याने माय-लेकावर केला हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीला कट मारल्याच्या रागातून ९ जणांच्या टोळक्याने माय-लेकावर हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

लखन गौतम मत्रे (वय २५, रा. स्वामी चिंचोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रामकृष्ण सुदाम मत्रे, सुदाम निवृत्ती मत्रे, शिवाजी निवृत्ती मत्रे, प्रशांत शिवाजी मत्रे, जीवन सुदाम मत्रे, भागवत तात्याराम मत्रे, प्रशांत हनुमंत देसाई, चंद्रकांत पोेटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जयराम बाबासो जांभळे (वय २३, रा. स्वामी चिंचोली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम यांचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. ते दौड तालुक्यातील स्वामी चिंचोलीत आईसह राहायला आहेत. बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास तो घरामध्ये टीव्ही बघत बसला होता. त्यावेळी तेथे आलेल्या लखन, रामकृष्ण, शिवाजी, सुदाम, प्रशांत, चंद्रकांतने जयरामला घराबाहेर बोलावले. गाडीला कट मारल्याच्या कारणावरून रामकृष्णने जयरामच्या डोक्यात गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यावेळी जयरामची आई भांडणे सोडविण्यासाठी आली असता, शिवाजी व प्रशांतने त्यांनाही धक्काबुक्की करून मारहाण केली. त्यानंतर प्रशांतने जयरामच्या आईच्या डोक्यात दांडक्याने मारहाण करून जखमी केले. दोन्ही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास दौंड पोलीस तपास करीत आहेत.