Pune News : वानवडी परिसरातील 8 वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून चौघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – रिक्षा चालकासोबत वाद झाल्यानंतर रिक्षा चालक पसार होत एका गल्लीत गेल्यानंतर चार जणांच्या टोळक्याने तो याच परिसरात राहत असल्याच्या संशयावरून येथील 8 गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात गाड्या तोडफोड सत्र मात्र थांबत नसल्याचे दिसत आहे. या चौघांना गुन्हे शाखेने पकडले आहे.

अझर रौफ शेख (वय 21 रा. हांडेवडी हडपसर), कैफ मोहसीन शेख (वय 19 रा. सय्यद नगर गल्ली न.15), राहील सादिक शेख (वय 22 रा. लोहियानगर हडपसर) व अक्षय ज्ञानेश्वर जगताप (वय 22 रा. हडपसर) अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात मार्केटयार्ड परिसरात दहशत माजवण्यासाठी 14 जणांच्या टोळक्याने मध्यरात्री मद्यधुंद होऊन राडा घातला अन सर्व सामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली. जवळपास 40 ते 50 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांनी पोलिसांची गस्त आणि कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान काल रात्री काही तरुणांची एका रिक्षा चालकासोबत वाद झाले होते. यावेळी रिक्षा चालक रिक्षा घेऊन पसार झाला. त्यानंतर या तरुणांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पण तो रिक्षा चालक येथील ससाणेवस्ती ग.नं 14 येथे घुसला. मात्र वा तरुणाांना तो या परिसरात आल्यानंतर सापडला नाही.

यामुळे चिडलेल्या या तरुणांनी येथे पार्क केलेल्या 8 वाहनांची तोडफोड केली. यात 3 कार, 2 टेम्पो व 3 दुचाकी फोडत दहशत माजवली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी धाव घेतली. तसेक्सह आरोपीवर गुन्हा दाखल केला. यादरम्यान गुन्हे शाखा देखील येथे येत त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला. तसेच परिसरातले सीसीटीव्ही पडताळणी केली. त्यानुसार युनिट पाचच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही तासात चारही आरोपींना अटक केली. त्यांना पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.