Pune : ‘रोडरोमिओ’चा 35 वर्षीय महिलेकडे फ्रेंडशीपसाठी हट्ट, नकार दिल्यानंतर दिली पतीला मारण्याची ‘धमकी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘रोडरोमिओ’ने 35 वर्षीय महिलेला ‘फ्रेंडशीप’ करण्यासाठी त्यांचा सतत पाठलाग केला; पण महिला नकार देत असताना देखील त्याने पतीला मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार कोंढव्यात घडला आहे. गेली तीन वर्षांपासून तो पाठलाग करत होता.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उंड्री रोड (पिसोळी गाव) येथील सुनील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी दोघेही एकाच सोसायटीत राहतात.

गेल्या तीन वर्षांपासून आरोपी हा फिर्यादी कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर त्यांचा पाठलाग करत असे. तो वारंवार फिर्यादीला फ्रेंडशिप करण्यास सांगत. फिर्यादीने प्रत्येक वेळी आरोपीस नकार दिला. फिर्यादी या 19 मार्चच्या दिवशी एनआयबीएम रस्त्यावर असतानाही आरोपीने त्यांना गाठले. त्यावेळी फिर्यादीने आरोपीला नकार दिला असता, आरोपीने त्यांच्या पतीस मारण्याची धमकी दिली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.