Pune : सोन्याच्या दुकानातून मूकबधिर व्यक्तीने 5 लाख 90 हजार रुपयांचे सोने असलेली बॅग नेली चोरून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याच्या दुकानात देणगी मागण्यास येत मूकबधिर व्यक्तीने 5 लाख 90 हजार रुपयांचे सोने असलेली बॅग चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. फडके हौद परिसरातील एका दुकानात हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी रोहित सांडभोर (वय ३१, रा. सेनापती बापट रस्ता) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३५ वर्षे वयाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फडके हौद परिसरात फिर्यादी यांचे श्री सिद्धनाथ हॉलमार्किंग सेंटर नावाचे दुकान आहे. ते दुकानात काम करत असताना एक अनोळखी व्यक्ती दुकानात आली. त्या व्यक्तीने मास्क घातलेला होता. ती मूकबधिर असल्यामुळे हातवारे करून बोलत होती. ती व्यक्ती तक्रारदार यांना एक मोठा कागद दाखवून अनेकांनी देणगी दिली आहे. तुम्हीही मोठी रक्कम देणगी म्हणून द्या, असे सांगत होती. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांच्याकडे हॉलमार्कसाठी आलेले पाच लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने एका प्लॅस्टिकच्या पाकिटात ठेवून ते काउंटरवर ठेवले होते. आरोपीने त्यांची नजर चुकवून ते दागिने चोरून नेले. ती व्यक्ती गेल्यानंतर तक्रारदार यांना हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.

You might also like