Pune News : कोरोना काळात पुणे शहरात मृत्यूचे प्रमाण वाढले तर जन्मदर कमी झाला

पुणे- कोरोनामुळे सन २०२० मध्ये पुणे शहरातील सरासरी मृत्यूदरामध्ये वाढ झाली आहे. परंतू याच कोरोनाच्या काळामध्ये पुण्यातील जन्मदरही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ आणि २०२० या कालावधीची तुलना करता २०२० मध्ये जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मृत्यूचे प्रमाण तुलनेने अधिकच राहील्याचे पाहायला मिळत असून कोरोनाने निश्‍चितच मोठी मनुष्यहानी झाल्याचे या आकडेवारीतून समोर येत आहे.

कोरोनामुळे २०२० हे वर्ष संपुर्ण जगासाठी केवळ ‘जगण्याच्या लढ्याचे’ होते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली अशा विकसित देशांमध्ये कोरोनाने थैमान घालत अनेकांचे बळी घेतले आहेत. आपल्याकडेही कोरोनाने मोठ्याप्रमाणावर जिवितहानी झाल्याचे चित्र माध्यमांतून पाहायला मिळत होते. ९ मार्च २०२० मध्ये पुणे शहरात देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर राज्य शासनाने १५ मार्चपासूनच प्रतिबंध लागू केले. तर २५ मार्चपासून संपुर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात कोरोनामुळे पुण्यात पहिला रुग्ण बळी पडला. यानंतर मात्र लॉकडाउन असून देखिल कोरोना बाधितांची तशीच मृतांची संख्या झपाट्याने वाढत गेली. पुणे हे अल्पावधीतच देशपातळीवर सर्वाधिक बाधित शहरांच्या यादीत अर्थात ‘रेड झोन’ मध्ये राहीले. यावर अगदी केंद्र, राज्य शासन, महापालिका आणि जिल्हा व पोलिस प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून साथ आटोक्यात आणण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू केले. याला बर्‍याच अंशी यश आले असून ऑक्टोबरमध्ये १९ हजारांपर्यंत पोहोचलेली ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या अनलॉकनंतरही दीड हजारापर्यंत कमी झाली आहे. ५० लाख लोकसंख्येच्या शहरात १ लाख ९२ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले तर ४ हजार ७७२ जण कोरोनामुळे दगावले. यामध्ये अनेकांना इतर आजारही असल्याने ते कोरोनाला सहजच बळी पडल्याचेही अभ्यासातील निष्कर्षातून पुढे आले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे मोठ्याप्रमाणावर मनुष्यहानी होत असल्याचे चित्र समोर येत असतानाच जानेवारी ते ऑक्टोबर या २०२० सालच्या दहा महिन्यांमध्ये अगोदरच्या अर्थात २०१९ सालातील जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीतील जन्मदरही कमी राहील्याचे समोर येत आहे. २०२० मध्ये पहिल्या दहा महिन्यांत ३९ हजार ६८० जन्म झाले. यामध्ये २० हजार ३५८ पुरूष तर १९ हजार ३२२ स्त्री बालके आहेत. तर २०१९ मध्ये पहिल्या दहा महिन्यांत हीच संख्या ४४ हजार ५४६ होती. यामध्ये २३ हजार २१६ पुरूष तर २१ हजार ३३० स्त्री बालके होती.

कोरोना काळात लॉकडाउनमध्ये रस्ते अपघात व इतर घातपाती मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी कोरोनामुळे तसेच इतर व्याधींवर कोरोनाकाळात उपचारामध्ये आलेल्या अडचणींमुळेही मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. २०२० मध्ये पहिल्या दहा महिन्यांत ३० हजार ११० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १६ हजार ९५९ पुरूष तर १३ हजार १५१ महिलांचा समावेश आहे. तर २०१९ मध्ये पहिल्या दहा महिन्यांत २७ हजार ५४६ जण दगावले आहेत. यामध्ये १६ हजार १३७ पुरूष तर ११ हजार ४०९ जणांचा समावेश आहे. या दोन्ही वर्षातील पहिल्या दहा महिन्यांचा तौलानीक अभ्यास केल्यास पुरूष जन्म आणि मृत्यूदर अधिकच राहीला आहे.

कोरोना बाधितांची संख्या सर्वाधीक असलेल्या काळात अर्थात २०२० मध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान मृत्यूचे प्रमाण भयानकरित्या वाढले. अगोदरच्या वर्षिच्या तुलनेत या कालावधीत तब्बल ४ हजार ५७६ अधिकच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

२०१९ (ऑक्टोबर पर्यंत)           २०२० (ऑक्टोबर पर्यंत)
जन्म – ४४,५४६                          ३९,६८०
मृत्यू – २७,५४६                           ३०,११०

(पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आकडेवारीवरून)