Pune : हडपसरमध्ये जम्बो कोविड केंद्र सुरू करण्याविषयी लवकरच निर्णय – निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   हडपसर परिसरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, खासगी रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळत नाहीत, त्यामुळे रुग्णांची उपचारासाठी हेळसांड होत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने जम्बो कोविड केंद्र सुरू करावे, अशी मागणी आज बुधवारी (दि. ७) शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, बापूसाहेब कोंडे, विभागप्रमुख अभय वाघमारे, प्रशांत पोमण, उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर उपस्थित होते.

महेंद्र बनकर म्हणाले की, मागिल काही दिवसांपासून हडपसर परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालये कमी पडत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचारासाठी अनेक अडचणी येत आहेत. सामान्य नागरिकांवर पैशाअभावी उपचार होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हडपसरमध्ये महापालिकेचे रुग्णालय नाही, खासगी रुग्णालयांकडून गरिबांना उपचारासाठी सहकार्य मिळत नाही. त्यामुळे शासकीय उपचार पद्धती तातडीने सुरू होणे सामान्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.