Pune : नाकाबंदीत पुण्यातील विद्यमान आमदार साहेबांच्या गाडीला अडविल्यानंतर भलताच ‘राडा’; नियमांबाबत विचारताच PAचा ‘थयथयाट’, म्हणाले – ‘आम्ही 18-18 तास काम करतो’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात नाकाबंदीत मास्क परिधान न करता कारमधून निघालेल्या एका विद्यमान आमदारांना अडविल्यानंतर भलताच राडा झाला. संबंधित आमदारांच्या पीएने थयथयाट घालत महिला कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. संचारबंदी आहे. विनाकारण बाहेर पडण्यास मनाई आहे. तर आवश्यक काम असल्यासच तुम्हाला बाहेर पडता येते. वाहनांमध्ये नियमानुसार 50 टक्के क्षमता आहे. तसेच मास्क घालणे आणि सोशल डिस्टसिंग गरजेचे आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत फडगेट पोलिस चौकीच्या चौकात पोलीस कर्मचारी व एसपीओ नाकाबंदी करत होते. यावेळी 1 इनोव्हा कार आली. त्यात पाचजण होते. त्यांनी मास्क देखील घातले नव्हते. कर्मचाऱ्यांनी ही कार अडवली. तर यावेळी विद्यमान आमदार साहेब इनोव्हामधून बाहेर आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना का अडवले अशी विचारणा केली. मास्क परिधान न केल्याचं आणि गाडीत पाच जण असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण त्यांनी आम्ही 18-18 तास काम करतो, असे सांगत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याकडे याबाबत माहिती दिली. त्यानंतर आमदार साहेबांचा बॉडीगार्ड यांनी आत जाऊन पोलिस अधिकार्‍यास भेटला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ‘त्या’ बॉडिगार्डला तुम्हीच सांगा काय करायचं असे विचारले. बॉडीगार्डने जाऊ द्या साहेब असे म्हणताच पोलिस अधिकार्‍यांनी ठीक आहे, सोडून द्या असा इशारा केला.

गाडी निघाल्यानंतर मात्र पीएने चांगलाच थयथयाट घातला. तुम्हाला कळत का ? आम्ही काम करतो, तुम्ही काय करता असे म्हणत महिला कर्मचार्‍याशी वाद घातला. तर त्यांच्याशी एकरी भाषा वापरली. त्यामुळे नाकाबंदी करत असलेल्या महिला कर्मचार्‍यांची देखील चिडचिड झाली. त्यांनीही मग संबंधितांवर कारवाई करावी म्हणून आग्रह करण्यास सुरूवात केली. उपस्थित पोलिस अधिकार्‍यांनी परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून प्रकरण शांततेत मिटवून घेतले. दरम्यान, आमदारांना एक आणि सर्व सामान्य व्यक्तीला एक न्याय कसा, असा प्रश्न आता निर्माण होत आहे तर 24 तास कर्तव्य करणाऱ्या पोलिसांशी आमदारच असे वागू लागल्यास कसे अशी चर्चा नंतर पोलीस दलात सुरू होती.