Pune : ‘हिंमत हारू नका, जगायला शिका, कोरोनावरही मात करू या’ – अनाथांची माय सिंधुताई सपकाळ

पुणे : लेकरांनो, तरुणांनो, प्रौढांनो तुम्हाला कोरोना महामारीतून वाचायचे आहे. त्यामुळे तुम्ही लस घ्या, हिंमत हारू नका, जगायला शिका, काळजी घ्या. तोंडाला मास्क लावा, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, ही वेळ म्हणजे आज जगण्याची कसोटीच आहे. कोरोनावर संघर्ष करून विजय मिळवायचा आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे, प्रत्येकाने एकमेकांची काळजी घ्या. सर्व समाजाला तारेवरची कसरत करायची आहे, पत्रकार मंडळी सतत धावपळ करीत आहेत, तुम्ही सगळ्यांचे दुःख दूर करता, तुमचेही कुटुंब आहे, त्यांची काळजी घ्या, तुम्ही वेदना पाठीला बांधून काम करीत आहात, रंजल्या-गांजलेल्यांना आधार देत आहात, तुमच्यामुळे जगातील सुख-दुःख समाजाला कळत आहेत, त्यामुळे तुमची लेखणी सबळ असू द्या, चालत राहा, मागे वळून पाहा, दुःखाला कवटाळून जगू, एक दिवस आपलाच विजय आहे, असा संदेश त्यांनी दिला.

ज्येष्ठ समाजसेविका अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांनी आज (शुक्रवार, दि. 7 मे 2021) रोजी मगरपट्टासिटीमधील लसीकरण केंद्रावर लसीचा दुसरा डोस घेतला. याप्रसंगी नगरसेविका हेमलता मगर उपस्थित होते.

माजी उपमहापौर निलेश मगर यांनी अनाथांची माई सिंधुताईंना विचारले की, महामारीमुळे परिस्थिती सर्वत्र बिकट झाली आहे. त्यामुळे काही अडचणी येतात का, कोरोना महामारीचे संकट भयंकर आहे. सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. त्यावर सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, कोरोना महामारीमुळे सर्वत्र परिस्थिती बिकट झाली आहे. आज समाजातील दानशूर व्यक्ती मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांच्याकडून गहू, तांदूळ, तेल अशा स्वरूपात मदत मिळत आहे. त्यामुळे संस्था चालविताना कोणतीही अडचण येत नाही, ही समाधानाची बाब आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, नगरसेविका हेमलता मगर म्हणाल्या की, मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मध्यंतरी दिवाळीदरम्यान कोरोना आटोक्यात येताच सर्व व्यवहार सुरू झाले. मात्र, मागिल दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड, ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नाहीत, त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी सावध पवित्रा घेत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे. 18 -44 वयोगटातील नागरिकांनी लस घ्यावी. तसेच 45 वयोगटापुढील नागरिकांनीही लस घेतली पाहिजे, तसेच ज्यांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे, त्यांना दुसराही घ्यावा. समाजातील दानशूर मंडळींनी माईंच्या संस्थेला शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.