Pune : प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मराठे यांच्या आत्महत्ये प्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा; दीप्ती सरोज काळे आणि निलेश उमेश शेलार यांच्यावर विश्रामबाग ठाण्यात FIR, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मिलिंद उर्फ बळवंत मराठे (वय 60) यांच्या आत्महत्या प्रकरणी आता एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मराठे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती.

याप्रकरणी दीप्ती सरोज काळे (रा. बाबधन) व निलेश उमेश शेलार (रा. कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बळवंत मराठे यांच्या पत्नी निना मराठे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद मराठे हे लक्ष्मी रस्त्यावर मराठे जेलर्सचे मालक होते. दरम्यान, 15 डिसेंबर 2020 रोजी त्यांनी आर्थिक अडचणीतून रात्री आठच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या कार्यालयात पिस्तूलातून छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती मराठे यांच्या मुलाला मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना 27 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर विश्रामबाग पोलिसांनी मराठे यांचा मुलगा प्रणव याची चौकशी केली. टाळेबंदीत त्यांनी एका बँकेकडून कर्जही काढले होते. व्यवसायातील मंदी तसेच आर्थिक अडचणीमुळे माझ्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रणव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते, असे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले.

आता त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यात बळवंत मराठे हे चालवत असलेले मराठे ज्वेलर्स प्रा. ली. कंपनी व मराठे ज्वेलर्स येथे गुंतवणूक केलेले पैसे परत द्यावे यासाठी दीप्ती काळे व निलेश शेलार हे त्यांच्या दुकानी व घरी येत असत. तसेच त्यांना शिवीगाळ व धमकी देत असत. तर फोनकरून अश्लील शिवीगाळ करत रस्त्यावर आणण्याची धमकी देत होते. तसेच मुलाला व कुटुंबाचे बरेवाईट करण्याची धमकी देत त्यांना त्रास देत होते. त्यांच्या त्रासातून बळवंत यांनी आत्महत्या केली. या दोघांनीच त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी याबाबत तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.