Pune : शहरात गेल्या 24 तासात आगीच्या 19 घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात लक्ष्मीपूजनाच्या रात्रीपासून विविध भागात आगीच्या १९ घटना घडल्या आहेत. यात पाच आगी या फटाक्यांमुळे लागल्याची नोंद अग्निशमन दलाकडे आहे. सुदैवाने आगीचे प्रकार किरकोळ आहेत.

शनिवारी लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची पुणेकरांकडून आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीमुळे वेगवेगळ्या भागात आग लागल्या आहेत. त्यात गुरुवार पेठेत फुलवाला चौक, सिंहगड रोड, कोथरुडच्या कचरा डेपोनजीक बाबा गार्डन हॉटेल, फरासखाना पोलीस ठाण्याच्या टेरेस तसेच येरवडा येथे कचऱ्याला आग लागली आहे. या आगी फटाक्यांची आताषबाजीमुळे लागल्या आहेत. यासोबतच वेगवेगळ्या भागात १९ ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडले.

बहुतांश ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याच्या माहिती आहे. पण आग्निशमन दलाकडे नोंद 5 घटनांची आहे. या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलाची दमछाक झाली. या पाच घटनासोडून शहरात इतर घटनांमध्ये बिबवेवाडी, कोथरुड कचरा डेपो, कात्रज गाव, येवलेवाडी, नाना पेठ, आंबेगाव पठार, वनाज कंपनी, मंगळवार पेठ, वानवडी, सिंहगड रोड, हडपसर, लोहगाव या भागात आगीच्या किरकोळ स्वरूपात घटना घडल्या आहेत.