Pune : सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणीचोरी; मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावाविरोधात शिक्रापुर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणीचोरी केल्याचा तसेच जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीने हकालपट्टी केलेला माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावाविरोधात शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस ज्ञानदेव तनपुरे यांनी शिक्रापूर पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी मंगलदास बांदल आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानदेव तनपुरे यांच्या विहिरीतून बांदल आणि त्याचा भाऊ हे दररोज जबरदस्तीने सहा टँकर पाणी चोरुन नेत होते. तसेच तनपुरेंच्या मालकीची जमीन बळकावण्याचाही बांदल भावंडाचा प्रयत्न होता, असा आरोप तनपुरे यांनी केला आहे. दरम्यान गेल्या वर्षी पुण्यातील पी. एन. गाडगीळ सराफ पेढीचे प्रमुख सौरभ गाडगीळ यांना तब्बल 50 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याने मंगलदास बांदल याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता जमीन बळकावण्यासाठी बांदल त्रास देत असल्याची तक्रार आली आहे.