Pune : ATM मध्ये ज्येष्ठ नागरिकाला मदतीच्या बहाण्याने कार्ड बदली करून 32 हजार रुपये काढत फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पैसे काढण्यास एटीएम सेंटरमध्ये गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदली करून ३२ हजार रुपये काढत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मगरपट्टा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही घटना घडली.

या प्रकरणी ६५ वर्षांच्या व्यक्तीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काळेवाडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांचे मगरपट्टा येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शचे अकाउंट आहे. सात सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास ते पेन्शनचे पैसे काढण्यासाठी या बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. फिर्यादी यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना पैसे निघाले नाहीत. त्यावेळी पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांना पैसे काढून देण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन हातचलाखीने दुसरेच कार्ड एटीएममध्ये टाकले. त्यानंतर त्यांना पिन क्रमांक टाकायला सांगितला. त्यांनी पिन क्रमांक टाकत असताना त्याने पाहिला. पण, तरीही पैसे निघाले नाहीत. त्यामुळे आरोपीने दुसरेच एटीएम कार्ड त्यांना परत दिले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून 32 हजार रुपये काढले. फिर्यादी यांना त्यांच्या खात्यातून पैसे कमी झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.