Pune : उन्हाचा ‘कार’, कोरोनाचा ‘कहर’ आणि विजेच्या लपंडावात फुरसुंगीकर ‘भरडले’

पुणे : उन्हाचा कार, कोरोनाचा कहर, विजेचा लपंडाव या त्रिकुटामध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थ भरडली जात आहेत. महापालिकेत गाव समाविष्ट झाले असले तरी शेती मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. मागिल काही दिवसांपासून सतत विद्युतपुरवठा खंडित होत आहे, त्यामुळे शेतीतील कामे खोळंबली आहेत. कोरोनामुळे कडक निर्बंध जारी केल्यामुळे शेतीकाम करण्यासाठी मजूरवर्ग मिळत नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.

फुरसुंगीतील शेतकऱ्यांनी सांगितले की, मागिल दहा दिवसांपासून दर तासाला विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतातील पिके सांभाळता येईनात, कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नाही. मात्र, विज नसल्यामुळे उन्हाच्या कडाक्याने जीव कासावीस होत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची अवस्था भयानक होत आहे. महावितरण कंपनी वीजबिल थकले, तर विजजोड बंद करण्यासाठी सरसावते. त्याच तत्परतेने विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम का करीत नाही, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शाळा-महाविद्यालये बंद असली, तरी ऑनलाइन अभ्यासवर्ग सुरू आहेत. ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. ग्रामीण भागात विद्युतपुरवठा खंडित आणि नेट मिळत नसल्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन परीक्षा सुरू असल्यामुळे वीज गेल्यानंतर मुलांची तारांबळ होत आहे. कोरोनामुळे घराबाहेर पडण्यास बंदी आहे, त्यामुळे नातेवाईकांकडे किंवा मित्राकडेसुद्धा जाता येत नाही, अशी बिकट अवस्था झाली आहे. विहिरीमध्ये पाणी आहे मात्र वीज नसल्याने पाणी देता येत नाही. उभी पिके जळून जाताना जीव कासावीस होत आहे. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर उडवाउडवीची उत्तरे दिली जाता, तर अनेकवेळा प्रतिसाद मिळत नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. दरम्यान, उरुळी देवाची (ता.हवेली) सेक्शन येथील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.