Pune : कोंढव्यात कडक लॉकडाऊनमध्ये अवैध दारू धंद्या तेजीत, गुन्हे शाखेकडून छापा अन् 4.25 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कडक लॉकडाऊनमध्ये देखील दणक्यात सुरू असलेल्या कोंढव्यातील अवैध दारू आड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत हातभट्टी अन विदेशी अशी सव्वा चार लाख रुपयांची दारू पकडण्यात आली आहे. या कारवाईमुळे कोंढव्यात अवैध धंदे तेजीत असल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी सुशीला दिलीप कुंभार (वय 60), अरुणा दिलीप कचरावत (वय 50) यांना पकडले आहे. तर अनिल शाम बिनवत आणि राहुल अनिल बिनवत हे दोघे पसार झाले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात कडक लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदीत बाहेर पडण्यास मनाई आहे. तर सर्वच आस्थापना बंद आहेत. मात्र तरीही आरोपी हे हातभट्टी आणि वेदीशी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभाग व दरोडा व वाहन चोरीविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, उपनिरीक्षक श्रीधर खडके, कर्मचारी राज्यश्री मोहिते, आणा माने, इरफान पठाण, नीलम शिंदे, तसेच मनीषा पुकाळे, धनंजय ताजने व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलीस आल्याची कुणकुण लागताच दोघेजण पसार झाले. तर या दोन महिलांना पकडले. याठिकानावरून सव्वा लाखांची रोकड आणि विदेशी दारू व हातभट्टी असा 4 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.