Pune : Indusind बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजर अंकिता रंजन व व्यवस्थापक जुबेर गांधीला अटक; खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर काढली होती मोठी रक्कम, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खातेधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर बँकेतील महिला अधिकारी आणि व्यवस्थापकाने या व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा देताना हा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी सव्वा दोन लाख रुपये काढले होते.

अंकिता रंजन (वय 30) व जुबेर गांधी (वय 34) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी चंद्रशेखर राजगोपालन यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांचे विमानतळ येथील indusind bank मध्ये बचत खाते आहे. त्यांचे वडील आजारी असत. त्यामुळे त्यांच्या खात्याचा व्यवहार हा बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर अंकिता रंजन व व्यवस्थापक जुबेर गांधी यांच्याकडे होता.

ते फिर्यादी यांच्या वडिलांना घरी येऊन आवश्यक ती मदत करत होते. मात्र, 10 मार्च रोजी फिर्यादी यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाईलवर निप्पॉन इंडिया मुचल फंड या कंपनीचा मेसेज आला. 22 मार्च रोजी केलेल्या विनंतीमध्ये बनावट सही असल्यामुळे व्यवहार पूर्ण करता येत नाही, असेे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादीला या सर्व प्रकाराचा संशय आला. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन माहिती घेतली असता त्यांच्या वडिलांच्या खात्यात केवळ 4 हजार 596 रुपये दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

विमानतळ पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तपास केला. त्यावेळी खात्यातून 2 लाख 37 हजार रुपये ट्रान्सफर केले असल्याचे दिसून आले. फिक्स डिपॉझिट बंद करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या बनावट सह्या करून 24 मार्च रोजी हे पैसे काढले होते.हा सर्व प्रकार बँकेतील अधिकारीच केल्याचे निष्पन्न झाल्यावर दोघांना अटक केली. दरम्यान आणखी काही खात्यातून त्यांनी पैसे काढले आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले.