Pune : कोथरूड परिसरातील IT इंजिनिअर पडला आमिषाला बळी, उच्च पदावरील नोकरीच्या आमिषाने 20.65 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोथरुड भागातील आयटी इंजिनिअर जादा पगाराच्या आमिषाला बळी पडला असून, सायबर चोरट्याने त्याला उच्च पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल २० लाख ६५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. जून २०१९ ते ऑक्टोबर २०२० कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी माधव केंजळे (वय ४०, रा. कोथरुड ) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फसवणूक व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव हे एका आयटी कंपनीत नोकरीस आहेत. जून २०१९ मध्ये सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. त्यांच्याशी ओळख वाढवून विश्वास संपादित केला. त्यानंतर सायबर चोरट्याने माधव यांना उच्च पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी विविध चार्जेजच्या नावाखाली सायबर चोरट्याने त्यांना ऑनलाईन रक्कम वर्ग करण्यास सांगितले.

त्यानुसार जादा पगाराची नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने माधव यांनी मागील वर्षभरापासून तब्बल २० लाख ६५हजार रुपये सायबर चोरट्याने दिलेल्या बँकखात्यात वर्ग केले. रक्कम जमा करुनही नोकरी न लावल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर माधव यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.