Pune Lok Sabha Election | गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न घेतल्याने निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election | पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट (Late MP Girish Bapat) यांचे निधन सुमारे ७ महिन्यापूर्वी झाले. भारतीय निवडणूक आयोगाने कायद्याप्रमाणे ६ महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणे अपेक्षित होते. परंतु, येथे पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या मुद्द्यावरून एका विधी पदवीधर तरुणाने निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. (Pune Lok Sabha Election)

याचिकाकर्ते सुघोष जोशी यांनी याचिकेत प्रश्न उपस्थित केला आहे की, लोकसभा विसर्जित होण्यास १५ महिन्यांचा
कालावधी असतानाही पोटनिवडणूक का घेतली नाही?

तत्पूर्वी, याचिकाकर्ते सुघोष जोशी यांनी माहिती अधिकार अधिनियमानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुणे लोकसभेच्या
निवडणुकीबाबत स्पष्टीकरण मागवले होते. यावर आयोगाने त्यांना उत्तर दिले की, कायद्याच्या चौकटीत राहून निवडणूक
न घेण्याचा निर्णय २३ ऑगस्ट २०२३ रोजी प्रमाणपत्राद्वारे आयोगाने घेतला आहे. (Pune Lok Sabha Election)

परंतु, आयोगाने दिलेल्या उत्तराने सुघोष जोशी यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अ‍ॅड. कुशल मोर, अ‍ॅड. श्रद्धा स्वरूप,
अ‍ॅड. दयार सिंगला व अ‍ॅड. प्रवीण सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २८ सप्टेंबर २०२३ पूर्वी होणे आवश्यक होते. परंतु निवडणूक आयोगाने ही निवडणूकच न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पोटनिवडणुकीचा कायदा काय सांगतो
लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १५१ (क) नुसार विधानसभा, विधान परिषद, लोकसभा किंवा राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्यानंतर ६ महिन्यांत पोटनिवडणूक घेऊन त्या जागा भरणे, हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.

याचिकाकर्ते सुघोष जोशी यांनी याचिकेत म्हटले आहे की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वतयारी उपक्रम सुरू झाल्यानंतर आठ ऑगस्ट २०२३ रोजी आयोगाने सहा राज्यांमध्ये विधानसभेच्या सात जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

त्याबरोबर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक आयोगाने जाहीर केली नाही. या पोटनिवडणुकांची घोषणा केल्यानंतर तीन दिवसांनी आयोगाने केंद्र सरकारला पुणे आणि इतर मतदारसंघांची पोटनिवडणूक न घेण्याचा प्रस्ताव पाठवला, असे याचिकेत नमूद आहे.

सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ पर्यंत आहे. त्यामुळे जून २०२३ पूर्वी लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक घेणे शक्य होते. या विचारानेच एक जागरूक मतदार म्हणून याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्ते सुघोष जोशी यांनी याचिकेत मागण्या केल्या आहेत की, निवडणुकीबाबत आयोगाचे प्रमाणपत्र घटनाबाह्य आणि निरर्थक आहे असे घोषित करावे. पोटनिवडणूक न घेण्याच्या निर्णयामागील आयोगाने सांगितलेली करणे कायद्याच्यादृष्टीने गैर आहेत, असे स्पष्ट करावे.

तसे याचिकेत पुढील मागण्या करताना त्यांनी म्हटले आहे की, पुणे मतदारसंघात ताबडतोब पोटनिवडणूक घेण्याचा
आदेश किंवा इतर कोणतेही योग्य आदेश करावा. पोटनिवडणूक न घेतल्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायदा,
१९५१ नुसार मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याच्या अधिकाराची पायमल्ली होत आहे.

त्यांनी पुढे नमूद केले आहे की, या टप्प्यावर पोटनिवडणुका घेतल्यास लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या
कामांवर परिणाम होईल, असा आयोगाचा तर्क वैध नाही. नवनिर्वाचित खासदाराला केवळ तीन ते चार महिन्यांचा
कार्यकाळ मिळाला असता हे कारण समर्पक नाही.

आयोगाला २९ मार्च २०२३ पासून कोणत्याही क्षणी पोटनिवडणूक घेणे शक्य होते. कारण रिक्त जागेचा कार्यकाळ हा २९
मार्च २०२३ पासून १५ महिन्यांचा होता. रिक्त झालेल्या जागांचा कार्यकाळ एका वर्षापेक्षा कमी असल्यास आयोगाला
त्या जागांसाठी पोटनिवडणूक घेता येत नाही, असे याचिकाकर्ते सुघोष जोशी यांनी याचिकेत म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Meeting | कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती, एका मंत्र्याच्या… संजय राऊतांच्या आरोपाला हसन मुश्रीफांचे उत्तर

Pune Police Mcoca Action | तलावारीचा धाक दाखवून व्यवसायिकांना लुटणाऱ्या रोहन चव्हाण व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 81 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA