Pune : घरफोडया करणार्‍या सराईतांच्या टोळीला लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक, 6.50 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.

जयसिंग काळुसिंग जुनी (वय 28), सोमनाथ नामदेव घारुळे (वय 24, दोघेही रा. बिराजदारनगर, वैदवाडी, हडपसर) व बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (24, रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून जयसिंग याच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत. तर सोमनाथ याच्यावर 4 आणि बल्लुसिंग टाकवर तबल 63 गुन्हे दाखल आहेत.

शहरात काही केल्या घरफोड्या थांबत नसल्याचे वास्तव आहे. याच दरम्यान मंतरवाडी व हांडेवाडी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांना दोन व्यक्ती या हांडेवाडीत दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ या परिसरात पथकाने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोघे हंडेवाडी भागात दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. पण पोलिसांना पाहून त्यांनी दुचाकी सुसाट पळवत पळ काढला. त्यावेळी पथकाने पाठलागकरून पकडले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेऊन तपास केल्यानंतर त्यांनी साथीदार बल्लुसिंग टाक याच्यासह गुन्हे केले असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला पकडले. त्यांना अटक करून सखोल तपास केला असता 6 गुन्हे उघडकीस आणत सोन्याचे दागिने, एलईडी टीव्ही, एक डीव्हीआर, दोन मोबाईल, एक सँट्रो कार, एक दुचाकी असा 6 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक निरीक्षक राजू महानोर, नितीन गायकवाड, गणेश सातपुते, सुनील नागलोत,निखिल पवार, शैलेश कुदळे, राजेंद्र दराडे व त्यांच्या पथकाने केली आहे.