Pune : लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे काम आजपासून पुणे पोलीस आयुक्तालयातून सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे काम आजपासून पुणे पोलीस आयुक्तालयातून सुरू झाले आहे. दोन्ही पोलीस ठाणे रात्री 12 वाजल्यापासून पुणे शहरात वर्ग करण्यात आले आहेत. आता पुण्यातील पोलीस ठाण्याची संख्या 32 वर गेली असून, कायदा सुव्यवस्था राखण्याचा ताण देखील शहर पोलिसांवर वाढला आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर पुणे शहर पोलीस दलात पुनर्रचना झाली. पूर्वी चार परिमंडळ होते. आता पाच परिमंडळ करण्यात आले आहेत. प्रत्येक परिमंडळात 6 पोलीस ठाणे आहेत. शहराची लोकसंख्या आणि हद्द वाढत असल्याने पोलीस ठाणे वाढीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला होता. त्यानुसार ग्रामीण पोलीस दलातील दोन आणि शहरात नवीन 4 पोलीस ठाणे सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. मात्र आतापर्यंत सर्व कागदपत्रावर हे काम सुरू होते.

मात्र आजपासून ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे आज रात्री 12 पासून पुणे शहर आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली आहेत. या पोलीस ठाण्यांचे काम आजपासून पुणे आयुक्तालयातून सुरू झाले आहे. तर उर्वरित चार पोलीस ठाणे देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.