Pune : खळबळजनक ! लग्नाला घरच्यांचा विरोध, प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचं पाऊल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत सर्वत्र नैराश्याचे वातावरण दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांच्या मानसिक ताणतणावात वाढ होत आहे. अशाच परिस्थितीत दौंड तालुक्यातील कुसेगाव परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीयुगुलांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला. त्यामुळे या प्रेमीयुगुलाने कुसेगावच्या जंगलात कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.

किरण क्षीरसागर (वय-25 रा. दौंड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर मुलगी पाटस येथील असून ती अल्पवयीन आहे. त्यांच्या विवाहास घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसेगाव परिसरातील जंगलात युवक आणि युवती किटनाशक पिऊन पडले असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. दोघेही नात्यातील असून त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करित आहेत.