Pune : मांजरी खुर्द ग्रामपंचायतीचा तिसऱ्या दिवशीही कडक लॉकडाऊन यशस्वी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबाधितांना उपचारासाठी रुग्णालय मिळत नसल्याने शहर-उपनगरासह ग्रामीण भागातील नागरिक सैरभर झाले आहेत. मांजरी खु।। (ता. हवेली) मध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (दि. 7 ते 16 मे) दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला असून, आज तिसऱ्या दिवशी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रुग्णालये आणि औषधालये वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी बंदचा उपयोग होईल. आपले कुटुंब आपली जबाबदारी याचे पालन करावे, नियमांचे उल्लंघन केले तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सरपंच विकासशेठ उंदरे व उपसरपंच किशोरशेठ उंदरे यांनी सांगितले.

मांजरी खु।। ग्रामपंचायत हद्दीमध्ये दररोज पाच ते दहा कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने खबरदारीचा उपाय ग्रामपंचायतच्या वतीने तातडीची बैठक घेऊन दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याप्रसंगी पोलिस पाटील अंकुश उंदरे, सरपंच विकासशेठ उंदरे, उपसरपंच किशोरशेठ उंदरे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल उंदरे, सीताराम उंदरे, अनिल थोरात, हिरामण गवळी, आबा उंदरे, नंदकुमार शेवाळे, विठ्ठल आव्हाळे, धर्मेंद्र मोरे, माऊली पवळे, दादा जेधे,पांडुरंग उंदरे, योगिता पवार, रामभाऊ उंदरे, विठ्ठल सावंत, सोमनाथ जाधव, संजय साळुंखे, शंकर पवार, शैलेश ढेरे, दिनेश उंदरे, पत्रकार अशोक आव्हाळे आदी उपस्थित होते.

सरपंच म्हणाले की, मांजरी खुर्दमध्ये कडक लॉकडाऊन केले आहे. दुध डेअरी सकाळी ७ ते ९ आणि सायं ६.३० ते ७.३० यावेळेत खुले राहतील. मात्र, दुग्धजन्य पदार्थांशिवाय इतर कोणतेही पदार्थांची विक्री करू नये, मेडिकल दुकानदारांनी फक्त औषधांची विक्री करावी, घराशेजारी किंवा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास आरोग्य उपकेंद्राला माहिती द्यावी, नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्तींनी ग्रा.पं. कार्यालयाला माहिती द्यावी, तसेच सतत नोकरी व व्यवसायानिमित्त गावाबाहेर जाणाऱ्या व्यक्तींनी स्वतःबरोबर कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कोरोना तपासणी करून घ्यावी, त्याचा अहवाल उपकेंद्र व ग्रा.पं.मधे द्यावा. सर्वांच्या हितासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, अन्यथा पाच रुपये दंड आकारला जाईल, तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल. कामाशिवाय (हॅास्पिटल) कोणीही बाहेर फिरू नये, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास व बसण्यास सक्त बंदी घातली आहे, असे त्यांनी सांगितले.