पुणे मार्केटयार्ड : बेमुदत बंदला उस्फुर्त प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तोलाईच्या प्रश्नावर हमाल, मापाडी आणि भुसार व्यापार्‍यांत तोडगा न निघाल्याने शनिवार पासून मापाडी आणि हमालांनी मार्केटयार्डातील भुसार बाजारात बेमुंदत बंद पुकारला आहे. त्यामुळे या विभागात सकाळपासून गाड्या उतरूण घेणे तसेच भरणे हे काम ठप्प होते.

गेल्या काही दिवसापासून भुसार विभागातील व्यापार्‍यांनी तोलाई देणे बंद केले आहे. त्याविरोधात गेल्या 25 ते 26 दिवसांपासून हमाल व मापाडी दि पुना मर्चटस चेंबरच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले होते. या प्रश्नाबाबत हमाल, मापाडी, व्यापारी आणि बाजार समिती यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र त्यात तोडगा न निघाल्याने मापाडी, हमालांनी आजपासून (शनिवार) बेमुंदत बंद पुकारला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे संघटक संतोष नांगरे यांनी कळविली.

महात्मा फुले समता प्रतिष्ठान येथे आज (शनिवार) जेष्ठ कामगार नेते डाॅ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कामगार युनियनचे विलास थोपटे, संतोष नांगरे, संजय साष्टे, हमाल पंचायतचे नवनाथ बिनवडे, गोरख मेंगडे, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरघे, हणुमंत बहिरट आदि उपस्थित होते. सोमवार ता.४ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता शिदोरीगृहापासुन पणन महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत झाला.

“गेल्या काही दिवसांपासून मार्केटयार्डातील भुसार बाजारात हमाल, मापाडींना काम न देण्याची भूमिका व्यापार्‍यांनी घेतली आहे. इलेक्ट्रॉनिक काट्यामुळे तोलणारांची गरज नसल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र हे प्रकारण न्यायप्रविष्ट असतानाही मापाडींना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे काम सुरू आहे. बाजारात काही ठिकाणी मापाडींना कामावरून काढून टाकण्याचे प्रकार घडत आहेत. या अन्यायाविरोधात मापाडी, हमालांनी बेमुंदत बंद पुकारला आहे. “- डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळ.