Pune : मार्केटयार्डातील व्यवहारांसाठी आता आठवड्यामधून पाचच दिवसांची परवानगी, आजपासून किरकोळ बाजार पुर्णपणे बंद तर होलसेल मार्केट सुरू राहणार – पोलिस उपायुक्त नम्रता पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मार्केटयार्डमधील वाढत्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी आता पुणे पोलिसांनी आठवड्याचे पाचच दिवस येथील व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर किरकोळ बाजार पूर्णपणे आजपासून बंद करण्यात आला आहे. केवळ होलसेल मार्केट यापुढे सुरू राहणार आहे, असे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले आहे.

शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही मार्केटयार्डमधील गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. आज देखील भयावह गर्दी याठिकाणी झाली होती. ही प्रचंड गर्दी पाहून पुण्यात संचारबंदी आहे का, असा प्रश्न निर्माण झाला होता. या गर्दीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली.

लागलीच सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे आणि परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी मार्केटयार्ड परिसर गाठला. पोलिसांचा ताफा आत शिरल्यानंतर मात्र येथील सर्वांची पळपळ झाली. पोलिसांनी रस्त्यावर फळे व इतर वस्तू विक्री करणाऱ्यांना बंद करण्यास लावत या गर्दीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील कमी झाली आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी किरकोळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार येथील व्यापारी व प्रशासन यांच्यासोबत बैठक घेत त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आठवड्याचे पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार असे मार्केटयार्डमधील फक्त होलसेल व्यापार सुरू राहील. तर किरकोळ बाजार आणि परिसरात रस्त्यावर बसून विक्री करणारे बंद असणार आहे. या दोन्ही गोष्टी शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहेत, असे उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले. त्यामुळे येथील गर्दीवर नियंत्रण तर मिळणार आहेच, पण संभाव्य धोका देखील टळणार आहे.