Pune : महापालिका व वुई केअर हेल्थकेअर संस्था अल्पदरात कॅन्सरच्या रुग्णांना उपलब्ध करून देणार ‘लिनाक’ रेडिओथेरपी

पुणे : पुणे महापालिका आणि वुई केअर हेल्थकेअरच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगांवर उपचारांसाठी लिनिअर ऍक्सेलेटरद्वार (लिनाक) रेडिओथेरेपीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही ठराविक ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध असून महागडी देखिल आहे. महापालिका सी.जी.एच.एस. दरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. वुई केअर हेल्थकेअरसोबत करार करणे आणि महापालिकेच्या हिश्श्याचे १४ कोटी ८५ लाख रुपये संबधित संस्थेला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

कर्करोगाच्या रुग्णांची संख्या संपुर्ण देशभरात वाढत आहे. सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचाराचा भाग म्हणून लिनिअर ऍक्सलेरेटर द्वारे रेडिओथेरपी ही उपचार पद्धती उपयुक्त ठरत आहे. ही सुविधा कुठल्याही शासकिय अथवा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. पुण्यातही केवळ तीन खाजगी रुग्णालयांमध्ये ही सुविधा असून सर्वसामान्य रुग्णांना येथील खर्च परवडणारा नाही. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने खाजगी वैद्यकीय संस्थेसोबत कर्करुग्णांना रेडिओथेरपी देण्यासाठी अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबविली होती. यामध्ये क्रस्ना डायग्नोस्टिक प्रा. लि. आणि वुई केअर हेल्थकेअर या दोन संस्था पुढे आल्या आहेत. त्यापैकी वुई केअर हेल्थकेअरचे दर हे क्रस्ना डायग्नोस्टीक पेक्षा कमी आले आहेत. प्रकल्पासाठी अंदाजे ३५ कोटी रुपये खर्च असून त्यापैकी १४ कोटी ८५ लाख रुपये महापालिका देणार आहे. ही रक्कम महापालिका एकदाच वुई केअर हेल्थकेअरला देणार असून उर्वरीत खर्च हीच संस्था करणार आहे.