Pune : पालिका यंत्रणा निविदेसाठी नको, ‘कोरोना’ नियंत्रणासाठी वापरा, काँग्रेसची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाची साथ हाताबाहेर गेली असताना ती नियंत्रणात आणण्याऐवजी महापालिकेची यंत्रणा निविदा प्रक्रियेत अडकली आहे असा आरोप पुणे शहर काँग्रेस पक्षाने केला असून पालिका यंत्रणा साथ आटोक्यात आणण्यास व्यस्त न राहिल्यास आंदोलन केले जाईल असा इशाराही पक्षाने दिला आहे.

कोरोना साथीबद्दल चर्चा करून निवेदन देण्यासाठी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना आज (बुधवारी) भेटले. या शिष्टमंडळात माजी आमदार मोहन जोशी, अविनाश बागवे, मेहबूब नदाफ, अजित दरेकर, अरविंद शिंदे, अमोल राजगुरू, विठ्ठल गायकवाड, सुजित यादव आदी उपस्थित होते.

कोरोना साथीचा संसर्ग वाढण्याचा धोका मे महिन्यातच काँग्रेस पक्षाने लक्षात आणून दिला होता आणि वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करा अशी मागणी केली होती. पण, खेदाने असे म्हणावे लागते की, सत्ताधारी भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले. उलट भाजप आणि प्रशासन निविदा प्रक्रियेतच अडकून राहिले. अंबिल ओढा कल्वर्ट आणि सीमाभिंत याची निविदा उदाहरण देता येईल. आपत्कालीन परिस्थितीत तातडी नसलेल्या कामांची टेंडर्स लावण्यात आलेली आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे निमित्त पुढे करून मुख्य सभेत चर्चा टाळण्यात आल्या आहेत आणि स्थायी समितीत मात्र बैठकांचे सत्र चालू आहे. समितीला परिस्थितीचे गांभीर्य नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पालिका यंत्रणेने कोरोना नियंत्रणालाच प्राधान्य द्यावे अन्यथा आयुक्त कार्यालयासमोरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.