Pune : दीड वर्षांपूर्वी झालेल्या दीपक वाडकर खून प्रकरणाचा पर्दाफाश, गुन्हे शाखेकडून 4 जण अटकेत, वरंधा घाटात सापडली फक्त हाडं !

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा सराईत गुन्हेगारांनी केवळ सतत शिवीगाळकरून धमकावत असल्याच्या रागातून अपहरण करत त्याचा खुन करून मृतदेह वरंधा घाटात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तबल दिड वर्षानंतर हा खुनाचा गुन्हा उघड करत चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

गणेश यशवंत चव्हाण (वय 23), विशाल श्रीकांत जाधव (वय 32), सुनील शंकर वसवे (वय 23, सर्व. रा. बिबवेवाडी) आणि दशरथ अरुण शिंदे (रा. कासुर्डी, शिवापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दीपक बापू वाडकर (वय 21) याचा खून झाला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना चौघांना पकडले होते. यावेळी एक पसार झाला होता. या चौघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करून पोलीस कोठडी घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत होती.

त्यांच्याकडे सखोल तपास करत असताना त्यांनी दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला दीपक वाडकर याचा खून केल्याचे सांगितले. दीपक हा बिबवेवाडी येथे राहत होता. तो मार्च 2019 पासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी मिसिंगची तक्रार दिली होती. तपासात तो बेपत्ता असल्याचे समोर आल्यानंतर आणखी चौकशी केली. यावेळी आरोपींनी तो सतत शिवीगाळ करत मारण्याची धमकी देत असे सांगितले. त्यामुळे त्याला वरंध घाटात फिरायला जायचे असे सांगून नेले. तेथे त्याला दारू पाजली. तसेच त्याच्यावर वारकरून त्याचा खून केला. खुनानंतर त्याचा मृतदेह वरंध घाटात टाकून दिला असल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी वरंध घाट पिंजून काढत या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

ही कारवाई अप्पर आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक निरीक्षक जयंत जाधव, उपनिरीक्षक नितीन शिंदे, पथकातील आंब्रे, उसुलकर, तारू, भिलारे, चोरमले, फरांदे, शेख, मदने व गिर्यारोहक संस्थेच्या सुनील बलकवडे, सुमित गावडे, भगवान चवळे यांच्या पथकाने केली आहे.

फक्त हाड सापडली !

दीपक याचा खुनकरून आरोपींनी त्याचा मृतदेह वरंध घाटात खोल दरीत टाकला होता. यामुळे तो शोधताना पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांनी गिर्यारोहक यांची यासाठी मदत घेतली. पण दीपक याचे काही हाडे सापडली. त्यावरून समजत नसल्याने त्यांनी याची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर तो दिपक असल्याचे निष्पन्न झाले.