Pune News : मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच, सुदैवाने रिक्षातील 2 महिन्यांचे बाळ सुखरुप बचावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-बंगलुरु महामार्गावर (Mumbai-Bangalore highway) पहाटेपासून अपघाताची मालिका सुरु असून आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी 6 अपघात घडले आहेत. या अपघातात 2 जणांचा मृत्यु झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, भूमकर पुलावरुन एक ट्रक खाली कोसळला आहे. या अपघातांमुळे संपूर्ण महामार्गावर  वाहतूक कोंडी झाली आहे. पुढे ट्रॉफिक जाम झाले असल्याचे दिसत असतानाही दोन ट्रक पुढे थांबलेल्या वाहनांवर जाऊन धडकले आहेत. मुंबई बंगळुरु महामार्गावरील (Mumbai-Bangalore highway) कात्रज येथील बोगद्यानंतर असलेल्या तीव्र उतारावर वारंवार अपघात होत असून सोमवारी पहाटे या भागात दोन अपघात झाले असून त्यात दोघांचा मृत्यु झाला आहे. तर तिघे जण जखमी झाले होते. या अपघातानंतर अपघातांची मालिकाच या महामार्गावर सुरु झाली. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

कात्रजवरुन भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक भूमकर पुलावरुन खाली कोसळला. त्यामुळे पुलाखालील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यात एक रिक्षा या पडलेल्या ट्रकला जाऊन धडकल्याने त्यातील तिघे जण जखमी झाले. सुदैवाने रिक्षातील २ महिन्यांचे बाळ सुखरुप बचावले. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असताना कात्रजकडून येणार्‍या ट्रकने पुढे असणार्‍या वाहनांना धडक दिल्याच्या दोन घटना घडल्या. त्यात ग्रामीण पोलीस दलाची व्हॅन आणि एका कारचे नुकसान झाले आहे.

या अपघातांच्या मालिकेमुळे संपूर्ण महामार्ग जाम झाला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून रस्ता मोकळा करण्याचे काम करीत आहेत.