Pune News : स्वतःच्या चुकीमुळे झाला अपघात; अपंगत्व आलेल्या तरुणीला मिळणार निम्मीच भरपाई ! तरुणीच्या निष्काळजीपणे अपघात झाल्याचा न्यायालयाचा निष्कर्ष

पुणे : पीएमपीच्या बसचा वेग कमी झाल्यानंतर तिच्यातून उतरल्यानंतर झालेल्या अपघातात (Accident)  अपंगत्व आलेल्या तरुणीला निम्मीच नुकसान भरपाई (compensation) देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिले आहे. तरुणीच्या निष्काळजीपणाने अपघात (Accident)  झाल्याचा निष्कर्ष काढत 11 लाख 97 हजार 513 रुपये नुकसान भरपाई (compensation)   मिळण्यास पात्र असतानाही तिला 5 लाख 98 हजार 766 रुपये मिळणार आहेत.

न्यायप्राधिकरणाचे सदस्य प्रदीप अष्टुरकर यांनी हा आदेश दिला. नुकसान भरपाईच्या रक्कमेवर अर्ज दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक नऊ टक्के व्याजही विरुद्ध पक्षास द्यावे लागणार आहे. तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने बसचे चाक तरुणीच्या पायावरून गेले. या अपघातात तरुणीला कायमस्वरूपी 51 टक्के अपंगत्व आले आहे. या प्रकरणात पीएमपी प्रशासन, बसचा मालक आणि विमा कंपनी असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात जखमी 24 वर्षीय तरुणीने न्यायप्राधिकरणात तक्रार दाखल केली होती. विमा कंपनीच्या वतीने ऍड. मनोहर माहेश्‍वरी आणि ऍड. प्रणिता वाळवेकर यांनी तर पीएमपीच्या वतीने ऍड. अतुल गुंजाळ यांनी काम पाहिले. 4 एप्रिल रोजी 2014 संबंधित तरुणी शिवाजीनगर ते स्वारगेट बसने प्रवास करीत होती. सायंकाळी सहाच्या सुमारास बसचा वेग मामलेदार कचेरी येथे कमी झाला. मात्र बस पूर्णपणे थांबली नसताना चालत्या बसमधून तिने उडी मारली. त्यामुळे ती तोल जाऊन रस्त्यावर पडली व बसचे चाक तिच्या पायावरून गेले. त्यामुळे ती कामयस्वरुगी अपंग झाली.

बस चालकावर दाखल झाला होता गुन्हा :
अपघातानंतर तरुणीला बसचालक आणि स्थानिकांनी उपचारासाठी ससून येथे नेले होते. तिच्यावर दोन महिन्यापेक्षा जास्त काळ उपचार सुरू होते. या अपघाताची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ही तक्रार दाखल केली. पोलिसांनी बसचा चालक अपघातास जबाबदार असल्याचे सांगत गुन्हा दाखल केला. मात्र, तिने चालत्या बसमधून उतरण्याचा प्रयत्न केल्याचे विमा कंपनीचे वकील माहेश्‍वरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.