Pune News : पुणे – सोलापूर महामार्गावर भिगवण जवळ भीषण अपघात; लातूरचे तिघे जागीच ठार तर दोघे जखमी, माने कुटुंबावर शोककळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे – सोलापूर महामार्गावर भिगवण येथे ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यु झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. पुणे – सोलापूर रोडवरील भिगवण येथील डाळज येथे रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

गीता अरुण माने, मुकुंद अरुण माने आणि अरुण बाबुराव माने (सर्व रा. लातूर) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. साक्षी अरुण माने आणि कारचालक महादेव नेटके (५६) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

माने कुटुंबिय पुण्याहून कारने लातूरला जात होते. सोलापूर महामार्गावर डाळजजवळ रस्त्याने ऊसाने भरलेल्या ट्रालीसह ट्रॅक्टर जात होता. कारचालक नेटके याला हा ट्रॅक्टर दिसलाच नाही. त्यामुळे त्याने वेगाने पाठीमागून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, कार ट्रॉलीच्या खाली जाऊन अडकली होती. क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. त्यात तिघे जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत. दोघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.