Pune News : जप्त केलेल्या मालाचा पंचनामा न करणारे निरीक्षक व कर्मचार्‍यांवर कारवाई करणार – माधव जगताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने यापुढे अतिक्रमण कारवाई करताना व्हिडीओ रेकॉर्डींग आणि छायाचित्र काढली जाणार असून हेच पुरावे पंचनाम्यासाठी वापरण्यात येतील, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

अतिक्रमण विभागाच्यावतीने अनधिकृत व्यवसाय करणार्‍या छोट्या व्यावसायीकांवर कारवाई करण्यात येते. या कारवाई दरम्यान विक्रेत्यांच्या वस्तुंची तोडफोड करण्यात येते, तर मालही जप्त करण्यात येतो. हा माल सोडविण्यासाठी ५ हजार रुपये दंड आकारण्यात येतो. मात्र, दंड आकारणी करून माल सोडताना जप्त करण्यात आलेला पुर्ण माल मिळतच नाही. यापैकी बहुतांश विशेषत: किंमती माल चोरीला गेलेला असतो. तसेच बरेचदा कारवाई करून जप्त केलेला माल दंडाची रक्कम भरून घेण्याऐवजी ‘चिरिमिरी’ घेउन सोडला जात असल्याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत. एवढेच नव्हे तर नुकतेच चिरिमिरी घेउन कारवाईतील जप्त माल सोडणार्‍या अतिक्रमण विभागाच्या येरवडा भागातील दोन कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने अटकही करण्यात आल्याने अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब झाले आहे.

यासंदर्भात अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, की अतिक्रमण कारवाईच्यावेळी विक्रेते माल घेउन पळून जातात. बरेचदा कारवाई झाल्यानंतर पुन्हा विक्रेते त्याच ठिकाणी व्यवसाय करून वाहतुकीला अडथळा आणतात. त्यामुळे कमी वेळात अधिक विक्रेत्यांवर कारवाई करावी लागत असल्याने पंचनामा करणे शक्य होत नाही. परंतू यापुढील काळात कारवाई करताना संबधित व्यावसायीकाच्या स्टॉल, हातगाडी अथवा पथारीवरील मालाचे व्हिडीओ शुटींग आणि छायाचित्रण केले जाणार आहे. त्यामुळे पंचनामा करणे आणि कारवाई करणे अधिक सोपे होणार आहे. व्हिडीओ शुटींग आणि छायाचित्रण न करताच कारवाई करणार्‍या अतिक्रमण विभागाचे निरीक्षक व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.