Pune News : ज्येष्ठांच्या लसीकरणाच्या घोषणेनंतर यंत्रणा निर्माण करण्यास अवधीच मिळाला नाही; सर्व्हर डाउन, अपुर्‍या यंत्रणेमुळे लसीकरणाच्या दुसर्‍या दिवशीही गोंधळाचे वातावरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्र सरकारने १ मार्च पासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली असली तरी पुण्यासह अनेक ठिकाणी लसीकरणाची यंत्रणा उभी राहू शकलेली नाही. विशेष असे की, पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर ‘गाईडलाईन्स’ देण्यात आल्याने यंत्रणा उभारण्यास वेळच मिळाला नाही तसेच लसीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या ऑनलाईन सिस्टिमचा ‘सर्व्हर’ डाउन होत असल्याने आज दुसर्‍या दिवशीही मोठा गोंधळ उडाला. लसीकरणाच्या या गोंधळाचा ‘ज्येष्ठ’ नागरिकांना त्रास होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात १ मार्च पासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील व्याधीग्रस्तांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली. सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येणार असून खाजगी रुग्णालयामध्ये २५० रुपये आकारून ही लस देण्यात येणार आहे. विशेष असे की प्रत्यक्ष मोहीम सुरु होण्यापुर्वी दोनच दिवस अगोदर ही घोषणा करताना लस घेणार्‍यांसाठी कोविन ०.२ हे अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच लसीकरण केंद्रावरही नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून लगेचच लसीकरण करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

खाजगी रुग्णालयांना ही लस केंद्र शासनाकडे ऑनलाईन पैसे भरल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतू यासाठीही ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. सोमवारी अर्थात कालच ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाच्या मोहीमेला सुरूवात करण्यात आली. पुण्यात ऑनलाईन नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्य सरकारने लसीकरण केंद्रांची अर्थात शासकिय रुग्णालयांची यादीही तयार केली आहे. परंतू काल पहिल्याच दिवशी शासनाच्या ससून रुग्णालयासह महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पीटल, कोथरूड येथील सुतार दवाखाना आणि येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात सकाळी दहा वाजल्यापासूनच लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी झाली. मात्र, केंद्रीय यंत्रणेकडून सॉफ्टवेअरचा की वर्डच सकाळी दहा वाजल्यानंतर मिळाल्याने या रुग्णालयातील अधिकार्‍यांनाही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. बर्‍याच प्रयत्नानंतर सॉफ्टवेअर सुरू झाले, मात्र सर्व्हर डाउनमुळे नोंदणी केलेल्यांची नावेही सॉफ्टवेअरमध्ये दिसत नसल्याने अनेकांना परत जावे लागले. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांसोबतच १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झालेल्या फ्रंट लाईन वर्कर्सलाही बसला. त्यामुळे काल दिवसभरात वरील चार रुग्णालयात जेमतेम ४७८ नागरिकांचे लसीकरण होउ शकले. यामध्ये १५४ ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्ष वयावरील १६ व्याधीग्रस्तांचा समावेश होता.

दरम्यान, प्रशासनाने महापालिकेची रुग्णालये तसेच सीसी सेंटरमध्येच लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी सुरू केली आहे. परंतू आज सलग दुसर्‍या दिवशी सर्व्हर डाउन झाल्याने ससून रुग्णालय, कमला नेहरू हॉस्पीटल, सुतार दवाखान्यात दुपारी बराचवेळ लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. लसीकरण केंद्र उभारताना प्रत्येक ठिकाणी इंटरनेटसह संगणक, प्रिंटर सुविधा. लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांना सावलीत बसण्यासाठी मंडप, पिण्याचे पाणी व अन्य व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली आहे. आज महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत १५ क्षेत्रिय अधिकार्‍यांची बैठक घेउन तातडीने सर्व सोयींयुक्त लसीकरण केंद्र उभारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लसीकरणासाठी पुढे आलेल्या खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींचीही आज संध्याकाळी बैठक घेउन त्यांना लसीकरणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

केंद्र शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे लसीकरण केंद्रावर यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. महापालिकेने ४१ केंद्र निश्‍चित केली असून काल चार केंद्र सुरू करण्यात आली. तर आज आणखी सात केंद्र रजिस्टर करण्यात आली आहेत. तर शहरातील पॅनेलवरील खाजगी रुग्णालयांपैकी दोन रुग्णालयांनी आजच लसीसाठी पैसे भरून मागणी नोंदविली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये खाजगी रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत महापालिकेच्या केंद्रांसह खाजगी रुग्णालयातही लसीकरणास सुरूवात करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.

– डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

गोंधळाच्या ठळक बाबी…

* सर्व्हर डाउनमुळे लसीकरणाला विलंब.

* लसीकरण केंद्रांवर येउन नोंदणी आणि तसेच ऑनलाईन नोंदणी अशा दोन्ही सुविधा देण्यात आल्याने लसीकरण केंद्रांवर क्षमतेपेक्षा गर्दी वाढत आहे.

* ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा आणि प्रत्यक्षात लसीकरणाचा दिवस यामध्ये यंत्रणा उभारण्यास अवधीच न मिळाल्याने केंद्रांवर गोंधळाचे वातावरण.