Pune News : कुख्यात गजा मारणे अ‍ॅन्ड गँगवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कूविख्यात गुंड गजा मारणेचं स्टेटस अन् फेसबुक आणि सोशल मीडियावर त्याचे ‘महाराष्ट्राचा डॉन’ असे व्हिडीओ टाकणाऱ्या गजा मारणे आणि त्याच्या साथीदारावर आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या या पवित्र्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गजा मारणे, त्याचे समर्थक तर त्याला कमेंट करणारे मारणेची आयटी टीम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कूविख्यात गुंड गजा मारणे याची गेल्या सोमवारी तळोजा कारागृह ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढली गेली. तर, त्याचे व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर आणि व्हाटसअप आणि इतर माध्यमातून स्टेट्स ठेवले गेले. त्याला महाराष्ट्राचा किंग आणि मुळशी पॅटर्नमधील गाजलेले डायलॉग देखील साथ देत हे व्हिडीओ तयार केले होते. त्यामुळे हे व्हिडीओ आणि ती जंगी रॅली गाजली. तर त्याचे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, पोलीस आता हे स्टेट्स ठेवणारे त्याला कमेंट करणारे आणि लाईक करणारे या सर्वांचा शोध घेणार आहेत. या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर पुणे पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत असेल तर त्यावर देखील लक्ष ठेवले जात असून, अश्या सर्वांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच पुण्याला व पुणेकरांना भयमुक्त वातावरण करून दिले जाईल, अशी ग्वाही देखील या माध्यमातून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांना दिली आहे.