Pune News : जांभूळवाडी परिसरात 2 गटात झालेल्या वादाचे पडसाद मध्यरात्री उमटले, 15 जणांच्या टोळक्याचा राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यातील जांभूळवाडी परिसरात दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद मध्यरात्री उमटले. यात पंधरा जणांच्या टोळक्याने अंदाधुंद राडा तर घातलाच पण जेलमधून सुट्टीवर आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला आणि त्याच्या साथीदारांनी दगडफेक करत प्रचंड दहशत माजवली. यामुळे भारती विद्यापीठ परिसरात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी यातील काही जणांना पकडले आहे.

याप्रकरणी जेलमधून सुट्टीवर आलेला गणेश पवार, विशाल सोमवंशी, कृष्णा लोखंडे, अजय घाडगे, सोन्या कांबळे, सुजित पवार, गोविंद लोखंडे, यश दुबे, रिहान शेख, शुभम, भूषण, चंदू आदित्य नाईक व इतर दोन ते तीन साथीदार यांच्यावर खुनाच्या प्रयत्नासह दंगलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सिद्धीकी शेख (वय 18) याने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज जांभूळवाडी रस्त्यावर शनीनगर येथे फिर्यादी राहतो. त्याठिकाणी सायंकाळी काही मुलांचे वाद झाले होते. हे वाद मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण ते नंतर मिटवण्यात आले. गणेश पवार याला मात्र याचा राग आला होता.

गणेश पवार हा मात्र त्याचे 15 ते 16 साथीदार घेऊन मध्यरात्री तेथे आला. तसेच तुफान राडा घालत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर दगडफेक करत मोठं मोठ्याने आरडाओरडा करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यात अचानक पुन्हा गणेश पवार याने त्याच्या कडे असणाऱ्या पिस्तुलातून फिर्यादीच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर दहशत माजवण्यासाठी हवेत गोळ्या झाडल्या. अचानक गोळीबार झाल्यानंतर मात्र सर्वांचेच धाबे दणाणले. प्रचंड गोंधळ उडाल्याने सर्वजण पळत सुटले होते. हा प्रकार काही वेळात पोलिसांना समजला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांना वातावरण शांत केले. काहीजणांना पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गणेश पवार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कारागृहातून बाहेर आला आहे. त्यानंतर त्याने एकाला बेदम मारहाण केली. त्याप्रकरणी एक गुन्हा दाखल असून, त्यात तो पसार झाला होता. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.