Pune News : पुण्यातील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (ACP) विदेशी महागडया श्वानाची चोरी, लष्कर पोलिसांनी CCTV तपासले अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विदेशी प्रजातीच्या श्वानांची चोरी करुन दुसरीकडे विक्री केली जात असल्याचे यापूर्वी समोर आले होते. मध्यंतरीच्या काळात श्वान चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याने हा प्रकार थांबला होता. मात्र, श्वान चोरी करणाऱ्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्याचे विदेशी महागडे श्वान चोरून नेले. पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांच्या बंगल्यातून बाहेर पडलेले विदेशी श्वान चोरट्यांनी पळवून नेले. लष्कर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून चोरट्यांना पकडले आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात श्वान सोपविले.

सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी हे लष्कर भागात वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे विदेशी श्वान असून ते श्वान अचानक बंगल्यातून बाहेर पडले. रस्त्यावर एकटेच फिराणारे हे श्वान पाहून दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी श्वान चोरून नेले. दरम्यान, घरातून श्वान बाहेर पडल्याचे पाहून चौधरी कुटुंबाने त्याचा शोध घेतला. मात्र, श्वान कुठेच सापडले नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तक्रार लष्कर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनमीत राऊत, महाडिक यांनी तपास सुरु केला. चौधरी रहात असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. दरम्यान, पोलीस हवालदार चव्हाण यांना विजय चौधरी यांचे श्वान हडपसर परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हडपसर परिसरातून श्वानासह दोघांना ताब्यात घेतले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून श्वान विजय चौधरी यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.